चंदगड तालुक्यातील साखर कारखान्यानी मागील वर्षांच्या एफ. आर. पी. चा प्रतिटन २०० रू हप्ता द्यावा, स्वाभिमानीचे तिन्ही कारखान्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

12 October 2022

चंदगड तालुक्यातील साखर कारखान्यानी मागील वर्षांच्या एफ. आर. पी. चा प्रतिटन २०० रू हप्ता द्यावा, स्वाभिमानीचे तिन्ही कारखान्यांना निवेदन

कारखाना व्यवस्थापनाला निवेदन देताना स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        २०२१-२२ मध्ये गाळप झालेल्या ऊसाचा एफ. आर. पी. अधिक २०० रुपयांचा दुसरा हफ्ता शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी केली आहे. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चंदगड तालुक्यातील अथर्व (हलकर्णी) ओलम (राजगोळी) व इको केन (म्हाळुंगे) या साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले.  हा दुसरा हप्ता द्या आणि हंगामाची सुरवात करा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

        यावेळी राजेंद्र गड्यान्नावर म्हणाले, ``यंदा बाजारात साखरेला चांगला दर मिळालेला आहे. तसेच इथेनॉलचे चांगले उत्पन्न झाले असून त्यालाही चांगला भाव मिळाला आहे. दुसरा हप्ता देण्यासाठी कारखान्याकडे पैसे उपलब्ध आहेत. त्यामुळे तीनही कारखान्यानी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता द्यावा.`` 

        यावेळी प्रा. दिपक पाटील म्हणाले की, ``चंदगड तालुक्यातील कारखान्यांनी एफ. आर. पी. दिलेली आहे. पण वाढीव दराची सुरुवात चंदगडपासून करावी आणि कोल्हापूर जिल्ह्याला आपण आदर्श घालून द्यावा. तसेच चालू हंगामामध्ये १५ ऑक्टोबरच्या ऊस परिषदेमध्ये माजी खा. राजू शेट्टी जो निर्णय घेतील तो सर्वावर बंधनकारक असून त्यानंतरच कारखाने सुरू करावेत.

        अथर्व साखर कारखान्याकडून शेती अधिकारी युवराज पाटील, इकोकेनमधून शेती अधिकारी निंबाळकर व ओलमकडून नामदेव पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी, शशिकांत रेडेकर, कृष्णा पाटील, बाळाराम फडके, विश्वनाथ पाटील, तुकाराम  मुरकुटे, गोपाळ गावडे, शिवाजी पाटील, एस. एम. कदम आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment