म्हाळेवाडी नजीकच्या मोरीवरील रस्ता काम रखडले - चंदगड लाईव्ह न्युज

28 October 2022

म्हाळेवाडी नजीकच्या मोरीवरील रस्ता काम रखडले


म्हाळेवाडी (ता चंदगड) गावानजीक मोरी वरील रखडलेले रस्त्याचे काम

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          कोवाड ते पाटणे फाटा मार्गावर म्हाळेवाडी नजिक नव्यानेच बांधलेल्या मोरीवरील रस्ता काम बरेच महिने रखडलेल्या अवस्थेत आहे. गेल्या दोन महिन्यात या ठिकाणी दुचाकी व छोट्या चार चाकी कार यांना अपघात होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 

          पंधरा दिवसांपूर्वी मोरी वरील खचलेल्या रस्त्यात छोटे चार चाकी वाहन बंद पडल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. सध्या चंदगड तालुक्यातील दौलत, हेमरस, म्हाळुंगे या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने येथून रोज शेकडो ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. मोरी रस्त्यावर टाकलेला भराव खचल्याने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉल्या हेलकावे खात जात आहेत. उसाने भरलेली वाहने पडल्यास ऊस व वाहनाच्या नुकसानी बरोबरच मोठा अनर्थ घडू शकतो.  

         उसाची वाहने जाताना पादचारी तसेच दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे. तसेच पूर्वेकडील घुलेवाडी गावाच्या बाजूचा रस्ता  पाण्याच्या प्रवाहाने मोठ्या प्रमाणात वाहून धोकादायक बनला आहे. या रस्त्याची उंची वाढवण्या बरोबरच मजबूत डांबरीकरण करावे. अशी मागणी प्रवासी वाहनधारकातून होत आहे. विशेष म्हणजे बांधकाम झालेली मोरी तालुक्याचे आमदार राजेश पाटील यांच्या गावापासून केवळ ५० मीटर अंतरावर आहे. ते याकामी लवकर लक्ष घालतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment