मनो_शारीरिक स्वास्थ हे सुदृढ समाज निर्मितीचे साधन, डॉ. एकनाथ पाटील, माडखोलकरमध्ये मानसिक आरोग्य व शारीरिक स्वास्थ्य' विषयावरील व्याख्यान - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2022

मनो_शारीरिक स्वास्थ हे सुदृढ समाज निर्मितीचे साधन, डॉ. एकनाथ पाटील, माडखोलकरमध्ये मानसिक आरोग्य व शारीरिक स्वास्थ्य' विषयावरील व्याख्यान

माडखोलकरमध्ये मानसिक आरोग्य व शारीरिक स्वास्थ्य' विषयावरील व्याख्यान डॉ. एकनाथ पाटील. 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          'आजच्या वेगवान युगात माणूस शारीरिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्य हरवत चालला आहे. जागतिकीकरणामुळे स्पर्धेत प्रचंड वाढ झाली आहे. युवा वर्ग संक्रमण अवस्थेतून जात आहे. नैराश्य, मानसिक व्याधी यामुळे युवकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. युवकांनी आपला आहार, विहार, दिनचर्या, जीवनशैली मध्ये जरूर ते बदल करून आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. एकदाच मिळणाऱ्या आयुष्यावर प्रेम करायला हवे. जीवन आनंदाने जगण्यासाठी एखादा छंद, खेळ यांची आवड जोपासावी. व्यायामाकडे लक्ष द्यावे.'असे प्रतिपादन डॉ. एकनाथ पाटील यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या 'मानसिक आरोग्य व शारीरिक स्वास्थ्य' या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. मानसिक आरोग्य दिनानिमित्त हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

         अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील म्हणाले' मनावरचा ताण हलका करण्याची गरज आहे. जीवनाचे ध्येय लक्षात घेऊन घातक स्पर्धा टाळायला हवी. सकारात्मक ताण जरूर घ्यावा परंतु नकारात्मक विचार दूर सारावेत. आत्मपरीक्षण करून जीवनशैलीत बदल करायला हवा.

         यावेळी' मनोकल्प' या भित्तीपत्रिकेचे पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तय्यबा नेसरीकर या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. प्रारंभी वृक्षाला जलार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. एल. भादवणकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. तर डॉ. एन. एस. मासाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. आर. ए. कमलाकर यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment