चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम शाहीच्या वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ होण्यासंदर्भात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2022

चंदगड तालुक्यातील हेरे सरंजाम शाहीच्या वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ होण्यासंदर्भात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू

हेरे सरंजाम प्रश्नी आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी.

चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील ५५ गावातील हेरेसरंजाम जमिनी भोगवटदार वर्ग २ च्या भोगवटदार वर्ग १ होऊन मिळणेबाबत सन १ ९ ६२ साली सरंजामशाही वतन खालसा करणेचा आदेश झाला. त्यानंतर चंदगड तालुक्यातील बर्‍याच गावातील जमिनी वर्ग २ चे वर्ग १ करण्यात आल्या, परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि गलथान कारभारामुळे उर्वरीत ५५ गावांचा हेरेसरंजाम भोगावटदार वर्ग २ हा शेरा अध्याप ७/१२ सदरी आहे तसा आहे. याला संपूर्ण जबाबदार प्रशासनच आहे. ५५ गावातील हेरेसरंजाम जमिनी भोगावटदार २ च्या भोगावटदार १ कराव्यात या मागणीसाठी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी चंदगड तहसील कार्यालयासमोर आज सोमवार दि.१० ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली.
      आंदोलन स्थळी तहसीलदार विनोद रणवरे यानी भेट देऊन आपल्या मागण्या वरिष्ठां कार्यालयाकडे पाठवल्या असून आपण आंदोलन मागे घ्या अशी विनंती आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना केली. 
     यावर महादेव मंडलिक-पाटील यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. असा ठाम निर्धार केल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान हेरे सरंजाम प्रकरणी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरात लवकर हेरेसरंजाम प्रकरणी तोडगा काढावा अशी विनंती केली. तसेच आज अंदोलन स्थळी महादेव मंडलीक - पाटील, अनिल रेंगडे, धोंडीबा चिमणे, राजू कापशे, राजाराम वाईंगडे अंदोलकाची भेट घेऊन पाठींबा व्यक्त केला.
  बुधवार पासून या बेमुदत अंदोलनात  ५५ गावातील शेतकरी हा प्रश्न सुटेपर्यंत साखळी पध्दतीने अंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना पाठींबा देणार आहेत. आंदोलन स्थळी माजी सभापती शांताराम पाटील, नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश फाटक, हानिफ सय्यद,रवि नाईक, सरपंच डी जी नाईक, सागर पाटील, देवीदास पाटील, आदीसह चंदगड वकील बार असोसिएशन, सरपंच संघटनेचे पदाधिकारी यानी भेट देऊन आंदोलनाला पाठींबा दिला.


           



    

No comments:

Post a Comment