मोरबी दुर्घटना, मदत कार्यात 'चंदगडी पाटील' अग्रेसर..! काही वेळातच उभारले हॅलोजन दिव्यांचे टॉवर - चंदगड लाईव्ह न्युज

31 October 2022

मोरबी दुर्घटना, मदत कार्यात 'चंदगडी पाटील' अग्रेसर..! काही वेळातच उभारले हॅलोजन दिव्यांचे टॉवर

विजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी असे हॅलोजन बल्ब टावर उभारून दुर्गटनास्थळावरील काळोख नाहीसा केला.


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

        गुजरात राज्यातील मोरबी शहरात मच्छू नदीवरील झुलता पूल तुटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे दीडशे लोक मरण पावले. शंभर लोकांची मर्यादा असलेल्या या ७०० फूट लांबीच्या लोखंडी रोपवे वर आधारित झुलत्या पुलावर पाचशे लोक एकाच वेळी चढले. जुना झुलता पूल काढून चार दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या नव्या पुलाला हा भार सहन झाला नाही व रविवार ३० ऑक्टोबर २०२२ ची सायंकाळ मोरबी शहरासाठी काळरात्र ठरली. दुर्घटनेत अनेक लहान बालकांसह सुमारे दीडशे नागरिकांचा बळी गेला.

       सायंकाळी साडेसहाच्या कातरवेळी पूल तुटताच त्यावरील सर्वजण भरलेल्या नदी पात्रात कोसळले. भयाण काळोखात मृत्यूच्या किंकाळ्यानी एकच हाहाकार उडाला. पोहता न येणाऱ्या शेकडोंना जलसमाधी मिळाली. भयाण अंधार मदत कार्यात व्हीलन ठरू लागला. हा अंधार नाहीसा करणे हे पहिले काम होते. या कामी पुढे सरसावले ते कोल्हापूर जिल्ह्यातील कालकुंद्री (ता. चंदगड) चे पाटील बंधू.

   अखिल सौराष्ट्र महाराष्ट्रीयन मंडळ चे अध्यक्ष डॉ. राजेश कल्लाप्पा पाटील व त्यांचे तीन बंधू याच शहरात राहतात. यातील  सुरेश हे मोरबी शहरातील 'स्ट्रीट लाईट' विभागाचे प्रमुख आहेत. तर विजय व दीपक या बंधूंचा लाइटिंग व मंडप डेकोरेशनचा मोठा व्यवसाय आहे. दुर्घटनेची खबर मिळतात विजय पाटील हे आपले सर्व  सहकारी कर्मचारी व साहित्य घेऊन दुर्घटनास्थळी धावले. बघता बघता त्यांनी नदीकाठी जनरेटरसह टॉवर उभे करून हॅलोजन दिव्यांनी परिसर प्रकाशमय केला. या प्रकाशात गुजरातच्या विविध भागातून आलेल्या रेस्क्यू टीमना आपले काम करणे सुलभ झाले. विजय पाटील यांना या कामी हरीश भाई जाधव, पियुष परमार, विष्णू मकवाना, सौरभ चनिया, दिनेश भाई आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. 

    सौराष्ट्र विभागासह गुजरात मध्ये मराठी माणसांना आधार ठरलेले डॉ राजेश पाटील व त्यांचे बंधू मोरबी शहरावर ओढवलेल्या आपत्कालात धावून आले. त्यांचे आगळे मदत कार्य मोरबी वासीय कधीच विसरणार नाहीत. या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment