नेसरी हायस्कूलच्या एस जे बुगडे सरांचा सेवानिवृत्ती निमित्त रविवार १६ रोजी गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2022

नेसरी हायस्कूलच्या एस जे बुगडे सरांचा सेवानिवृत्ती निमित्त रविवार १६ रोजी गौरव

एस. जे. बुगडे

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील एस एस हायस्कूल व जुनिअर कॉलेज चे अध्यापक  एस जे ( सुरेश जोतिबा) बुगडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव समारंभ रविवार दि. १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता होत आहे. तु कृ कोलेकर महाविद्यालय सभागृह नेसरी येथे ॲड. हेमंत कोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  

       शासकीय अध्यापक विद्यालय पेटाळा कोल्हापूर येथे डीएड पूर्ण केल्यानंतर बुगडे १ ऑक्टोबर १९८४ रोजी एस एस हायस्कूल येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. १९९१ ते ९५ पर्यंत ते बटकणंगले हायस्कूल व नंतर सेवानिवृत्ती पर्यंत नेसरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये कार्यरत होते. मराठी, इंग्रजी व विज्ञान विषयांचे उत्कृष्ट अध्यापक म्हणून त्यांची नेसरी पंचक्रोशीत वेगळी ओळख आहे. आपल्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेत त्यांनी हजारो विद्यार्थी घडवले.   

      सुरुवातीपासून समाजकार्याची आवड असल्याने आपल्या मूळ गावी कोळींद्रे (ता. आजरा) येथे व्ही के चव्हाण- पाटील पतसंस्था, ग्राहक संस्था, वाचनालय, महात्मा फुले जेष्ठ नागरिक सेवा संघ, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मूलन न्यास आदी संस्थांची स्थापना करून त्या माध्यमातून समाजकार्य केले. उचंगी धरण कृती समितीचे सचिव म्हणूनही धरणग्रस्तांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. सुरेश बुगडे खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण शिक्षक म्हणून समाजात वावरले. त्यांना याकामी आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी या कुटुंबातील सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

        बुगडे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन ए डी लोहार प्राचार्य एस एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज नेसरी व गौरव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment