कलियुगात संघटन हीच शक्ती - अभिजीत कुलकर्णी, चंदगड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संचलन - चंदगड लाईव्ह न्युज

03 October 2022

कलियुगात संघटन हीच शक्ती - अभिजीत कुलकर्णी, चंदगड येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संचलन

दसरा उत्सवानिमित्त चंदगड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संचलन झाले.  

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          "कलियुगात संघटन हीच शक्ती आहे. संघटित झाल्याशिवाय विजय शक्य नाही. समुद्राच्या उत्तरेस व हिमालयाच्या दक्षिणेस पसरलेल्या खंडप्राय भारत देशात शौर्याची परंपरा प्राचीन काळापासूनच आहे. अशा या भारतात चंद्रगुप्त मौर्य, शककर्ता शालिवाहन, विक्रमादित्य यासारखे सम्राट होऊन गेले. स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणणाऱ्या भगीरथाचे वारस आज आत्मविस्मृत झाले आहेत. पुन्हा एकदा आत्मविश्वासाने उभे राहिल्यास आपण नजीकच्या काळात निश्चितच विश्वगुरूपदी विराजमान होऊ शकतो," असे प्रतिपादन अभिजीत कुलकर्णी यांनी केले.

     ते चंदगड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलन व दसरा उत्सवानिमित्त बोलत होते. ते पुढे म्हणाले चरक, सुश्रुत, वागभट यांनी वैद्यकशास्त्र समृद्ध केले. भास्कराचार्यांनी जगाला शून्याची देणगी दिली. वराह मिहीरने खगोलशास्त्रात संशोधन केले. तळपदे यांनी विमानाचा मुंबई चौपाटीवर पहिला यशस्वी प्रयोग केला. भारत एकेकाळी समृद्ध देश होता. पारतंत्र्यामुळे आपले पारंपरिक ज्ञान आणि शहाणपणा  पाश्चात्यांनी आपल्याकडून हिरावून घेतला. देशाला संपन्नबनविण्यासाठी सामाजिक ऐक्य, स्वच्छ चारित्र्य, प्रखर देशभक्ती या गुणांचीआवश्यकता असून स्वयंसेवकांनी समर्पित वृत्तीने कार्य केले तर निश्चितच हिंदू राष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल.

           आपल्याला कोणावरही आक्रमण करायचे नसून अन्याय वअत्याचार यांच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती मात्रअसलीच पाहिजे. संपूर्ण समाज सुसंघटित करणे हेच आपले ध्येयअसले पाहिजे. याप्रसंगी स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध संचलन केले. कार्यक्रमास जिल्हा संघ चालक भास्कर श्रीनिवास कामत, शांताराम हजगुळकर, शाताराम भिंगुर्डे, अनिकेत मांद्रेकर यांच्यासह स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. तालुका संघचालक आशिष दाणी यांनी प्रास्ताविक केले. विवेक सबनीस यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. दीपक वडर यांनी वैयक्तिक तर संजय काणेकर यांनी सांघिक पदय सादर केले. जितेंद्र मुळीक यांनी अमृतवचन तर सुरेश बागिलगेकर यांनी सुभाषित सांगितले. यावेळी घोष पथकासह गणवेषधारी स्वयंसेवकांचे झालेले शिस्तबद्ध संचलन हा चंदगडकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. संतोष गावडे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment