चंदगड तालुक्यातील कारखानदाराकडून शेतकर्‍याची वर्षाला ४५ कोटीची काटामारी - माजी खासदार राजू शेट्टी, पाटणे फाटा येथे शेतकरी मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

02 October 2022

चंदगड तालुक्यातील कारखानदाराकडून शेतकर्‍याची वर्षाला ४५ कोटीची काटामारी - माजी खासदार राजू शेट्टी, पाटणे फाटा येथे शेतकरी मेळावा

१५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेला शेतकर्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन 

पाटणे फाटा (ता. चंदगड) शेतकरी मेळाव्यात बोलताना माजी खासदार राजू शेट्टी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

      चंदगड तालुक्यातील तीन कारखान्यांतून शेतकऱ्याची लुटमार सुरू आहे.वर्षाला दिड लाख टन ऊसाची काटामारी होत असून यामधून हे कारखानदार वर्षाला ४५ कोटीची शेतकऱ्यांची लुबाडणूक करत आहेत.पण काटा मारून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण-या कारखानदारांचा आता काटा काढल्याशिवाय सोडणार नाही. अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

          ते पाटणे फाटा (कारवे) ता.चंदगड येथे जागर एफ.आर.पी.चा संघर्ष ऊस दराचा...या मोहिमेसह जयसिंगपूर येथे होणाऱ्या २१ व्या ऊस परिषदेसाठी शेतकरी वर्गात जनजागृतीसाठी घेतलेल्या सभेत बोलत होते.

          प्रारंभी प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष प्रा.दिपक पाटील यांनी करून पाटणे फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लोक सहभागातून वजन काटा उभारण्याचा मानस व्यक्त केला.  

             श्री. शेट्टी पुढे म्हणाले , चंदगड तालुक्यात वर्षाला १५ लाख टन ऊस जात असेल तर दीड लाख टन चोरला जातो. त्यातून जवळपास ४५ कोटीची लूट होते. त्यामुळे या काटामारी करणाऱ्यांना आता सैल सोडणार नसल्याचा इशाराच दिला. तसेच योग्य वेळी हातोडा कुठे आणि कसा मारायचा हे मला नक्की कळतं. सध्या एफ.आर.पी वाढली तरी शेतकऱ्यांच्या हातात पडणारा पैसा पुर्वी इतकाच आहे. कारण उत्पादन आणि खर्च याचा मेळ बसत नाही आहे. खर्च वाढत चालले आहेत. त्यासाठीच शेतकरी अजूनही नियमित कर्जाचे ५० हजार रु.कधी मिळतात याची वाट बघत आहे. आणि ते पैसे शेतकर्याना मिळवून दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वासही शेट्टी यानी व्यक्त केला.

              यावेळी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यानी शेतकरी अडचणीत आला की तुम्हाला राजू शेट्टी आठवतो मग इतर वेळी तुम्हाला ते का चालत नाहीत ? तसेच शेतीमालाची किमत ज्या शेतकऱ्यांला कळली त्याला  त्याला शेट्टी यांची किंमत कळाली ,शशेतकऱ्यां प्रश्नावर जीव तोडून  कार्य कल्यानेच  त्यांच्या कार्याची व्याप्ती देशभर पसरल्याचे सांगितले.

               राज्यसचिव राजेंद्र गड्ड्यानावर म्हणाले गत हंगामातील  २०० रुपये हप्ता कारखान्याकडून शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही.हे २०० रूपये  कारखानदारांच्या छाताडावर बसून वसूल करून घेवूच, फक्त शेतकऱ्यानी पाठीमागे खंबीरपणे उभी रहा.असे सांगुन मागील थकबाकी साठी ७ ऑक्टोबर रोजी चंदगड तालुक्यातील तीनही कारखान्यांना निवेदन देणार आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पाटणे फाटा येथे एकत्र येण्याचे आवाहन केले. आणि मागील २०० रुपये वसूल केल्याशिवाय हे गळीत हंगाम सुरू करू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. तसेच जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांना होत असलेल्या नुकसान भरपाईसाठी दिवाळीनंतर पर्यावरण परिषद घेऊन आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले,तर चंदगड तालुक्यात जंगली प्राण्यांपासून होत असलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी दिवाळीनंतर पर्यावरण परिषद घेऊन आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

           यावेळी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप,सरपंच विष्णू गावडे,उपसरपंच पाडुरंग बेनके,रविंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली.

        यावेळी तालुकाध्यक्ष जगन्नाथ हुलजी,उपाध्यक्ष सुरेश कुट्रे,शशिकांत रेडेकर,सतीश सबनीस, विलास गावडे,महादेव बाणेकर,विश्वनाथ पाटील, तुकाराम मुरकुटे, जानबा चौगुले, तानाजी गडकरी,तानाजी चौगुले,कृष्णा पाटील, लक्ष्मण बेनके,गोपाळ गावडे,पिन्टू गुरव,विलास झाजरी   च्यासह शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते. 

              वजन काटा उभारणीला शेतकऱ्यांची आर्थिक मदत

          स्वाभिमानाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिपक पाटील यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लोक सहभागातून पाटणे फाटा येथे वजन काटा उभारण्याचा मानस व्यक्त केला. त्याला पाठिंबा देत महादेव बाणेकर,सरपंच विष्णू गावडे, उपसरपंच पाडुरंग बेनके,एम. एस. कदम यांनी देणगी जाहीर केली.

No comments:

Post a Comment