दौलतचा निर्णय मंगळवारी, शिवसेनेचे विजय देवणे व पो. नि. संतोष घोळवे यांच्यात खडाजंगी - चंदगड लाईव्ह न्युज

30 October 2022

दौलतचा निर्णय मंगळवारी, शिवसेनेचे विजय देवणे व पो. नि. संतोष घोळवे यांच्यात खडाजंगी

दौलत कारखाना स्थळी दौलत संदर्भात चर्चा करताना कामगार, शेतकरी, लोकप्रतिनिधी, वाहतूकदार

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील दौलत - अथर्व साखर कारखान्याच्या कामगारांच्या बोनसवरून सुरू झालेल्या वादावर आजही तोडगा निघू शकला नाही. कारखाना प्रशासनाशी चर्चा करून दोन दिवसांनी होणाऱ्या बैठकीत या वादावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र आज यावेळी चर्चा करताना अथर्वचे प्रमुख मानसिंग खोराटे यांच्या अनुपस्थितीवरून पोलिस निरीक्षक संतोष घोळवे व शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याने सभास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण या वादावर त्वरीत पडदा टाकण्यात आला.

          आज रविवार दि. ३० रोजी कारखाना परिसरात झालेल्या मेळाव्यात सर्व शेतकरी, कामगार, वाहतूकदार, लोकप्रतिनिधी यांनी कारखाना प्रशासनाशी बैठक घेवून तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, उप जिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, भिकू गावडे, नितिन पाटील, भिमराव चिमणे, मल्लिकार्जुन मुगेरी, विलास पाटील, विष्णू गावडे, तानाजी गडकरी, पिनू पाटील, युवराज पाटील, सुधाकर पाटीत, सुभाष जाधव, ब्लॅक पँथरचे सर्व पदाधिकारी, सर्व कामगार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान २२ वर्षे मुकादम म्हणून काम केलेले यल्लाप्पा पाटील यांनी भूषवले. यावेळी अपघाती मृत्यू पावलेले कारखान्याचे कामगार प्रकाश केसरकर (किणी)  यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

           यावेळी मेळाव्याची पार्श्वभूमी आणि कामगारांच्या प्रश्नांबाबत सविस्तर माहिती देत प्रदीप पवार यांनी प्रास्ताविक केले. शिवसेनेचे विजय देवणे यांनी अथर्व प्रशासनाशी चर्चा  करून समोरासमोर बसून हा प्रश्न मिटवावा अशी भूमिका घेतली. त्यासाठी त्यांनी चेअरमन खोराटे यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून दोन दिवसांनी मंगळवारी सायंकाळी चार वाजता कारखाना स्थळावर बैठक घेवून चर्चा करायला खोराटे तयार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी स्थानिक मंडळी, कामगार, शेतकरी यांच्या उपस्थितीत यावर निर्णय होईल असेही सांगितले.                  यावेळी कामगार आणि कारखाना दोघांमधील वाद मिटावा आणि हा कारखाना सुरळीत चालाव जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. यासाठी आपला प्रयत्न असलेचे बळीराजा संघटनेचे नितीन पाटील यांनी सांगितले. तसेच अथर्वच्या खोराटे यांच्या खाद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी राजकारण करतंय का हे बघावं लागेल. त्यासाठी अथर्व प्रशासनाला व्यसन घालण्याच काम संचालक आणि केडीसीसीने केलं पाहिजे असं मत पाटील यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर जर कोणी मी कुणाचंच एकणार नाही अशी भूमिका घेत असेल तर ही दुर्योधनाची भूमिका चालणार नाही. कारखान्याचे काम झालं असेल तर कारखाना चालू झाला पाहिजे. कोणतीही ताठर भूमिका घेवू नये, आमचं शत्रुत्व तत्वासाठीच असल्याची भूमिका नितीन पाटील यांनी मांडली.

         दौलतचे अध्यक्ष अशोक जाधव म्हणाले की, ``कारखाना चालण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. त्यामुळे कामगार आणि प्रशासन यांनी समोरासमोर येवून हा प्रश्न मिटवावा. तुम्ही या कामगारांना बाजूला करू शकत नाही. जर तुम्ही कारखाना चालवू शकत नसाल तर तसे सांगा म्हणजे काय तो निर्णय घेवू. त्यामुळे प्रत्येकाने इथे स्वार्थ न बाळगता हा कारखाना सुरू राहिला पाहिजे या दृष्टीने निर्णय घ्यावा. त्यासाठी आम्ही कुठेही येण्यासाठी तयार आहोत. आम्ही बँकेला देखील जाब विचारणार आहोत. आम्ही आमची डोकी फोडून हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे सामंजस्याने घ्यावं असं मत मांडले.

No comments:

Post a Comment