दिवसाढवळ्या तीन शेळ्यांची चोरी, कोठे घडली घटना - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2022

दिवसाढवळ्या तीन शेळ्यांची चोरी, कोठे घडली घटना


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

होसूर (ता. चंदगड) व बेकिनकेरे (ता. बेळगाव) या गावांच्या सीमेवर गत वर्षभरात बकरी चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. वारंवार चोऱ्या होत आहेत. यातच दसऱ्यादिवशीच बेकिनकेरे येथील शेतकरी राजू सनदी यांच्या अगसगे मार्गावरील गोठ्यातील तीन शेळ्या दिवसाढवळ्या चोरून नेल्या. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन वर्षांपूर्वी कागणी, तेऊरवाडी येथेही लाखो रुपयांची बकरी चोरीला गेली आहेत.

तातडीने पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे. बुधवारी दसऱ्यानिमित्त राजू सनदी हे आपल्या कुटुंबीयासह बेकिनकेरे येथे नागनाथ मंदिराकडे आले होते. या दरम्यान दरवाजा मोडून तीन शेळ्या लंपास केल्या. सातत्याने या परिसरात चोऱ्या होत आहेत. गत महिनाभरापासून होसूर व बेकिनकेरे येथील काही हॉटेल्सचे दरवाजे तोडून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. बेळगाव व चंदगड पोलिसांनी संयुक्तरित्या तपास करून सीमेवर होणाऱ्या चोऱ्या रोखाव्यात अशी मागणी होत आहे.



No comments:

Post a Comment