चंदगड तालुक्यातील खड्डेमय रस्ते तात्काळ दुरुस्त करा..! अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

10 November 2022

चंदगड तालुक्यातील खड्डेमय रस्ते तात्काळ दुरुस्त करा..! अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

चंदगड तालुक्यातील अडकुर ते तिलारी, पाटणे फाटा ते पारगड, बेळगाव- वेंगुर्ला हायवे, पाटणे फाटा ते कामेवाडी, हलकर्णी ते हेरे, तुर्केवाडी ते तिलारीनगर, कागणी ते राजगोळी खुर्द या सर्व रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था आहे. या सर्व रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय टाळावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करावे लागेल अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंदगड यांच्यावतीने उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले आहे.

या खड्डेमय रस्त्यांमुळे चंदगड तालुक्यातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम, सुगी हंगामामुळे ऊस, भात, रताळी, नाचणी व भाजीपाला वाहतूक करताना अरुंद व खड्डेमय रस्त्यांमुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचा नाहक मनःस्ताप वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी, पादचारी यांना होत आहे. वरील सर्व रस्त्यांची दुरुस्ती व रुंदीकरणाचे काम तात्काळ सुरू न केल्यास चंदगड तालुका मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष राज सुभेदार, प्रताप उर्फ पिणू पाटील यांच्या सह्या असून निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंदगड तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.No comments:

Post a Comment