भ्रष्टाचार समाजाला लागलेली कीड - विकास मोटे, चंदगड महाविद्यालयात संकल्प : भ्रष्टाचार मुक्ती अभियान कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2022

भ्रष्टाचार समाजाला लागलेली कीड - विकास मोटे, चंदगड महाविद्यालयात संकल्प : भ्रष्टाचार मुक्ती अभियान कार्यक्रम

कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     भ्रष्टाचाराची कीड समाजव्यवस्थेला लागली की मूल्यांची अधोगती होते, व्यावहारिकता धोक्यात येते आणि व्यक्तिगत स्वार्थ बोकाळतो. भ्रष्टाचार मग तो पैशांचा गैरवापर असो, विचारांची पायमल्ली करून वा कोणाची फसवणूक करून असो, तो समाजविघातकच असतो असे मत ग्रामविकास अधिकारी व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  विकास मोटे यांनी व्यक्त केले. ते चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालय चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित संकल्प : भ्रष्टाचार मुक्ती अभियान कार्यक्रमात बोलत होते.

         ते पुढे म्हणाले की, ``व्यापारी, अधिकारी, मालक वर्गाकडून गरीब, शेतकरी, निरक्षर, मजूर वर्गाचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. स्वतःची भौतिक संपत्ती भरमसाठ वाढविण्यात स्वारश्य मानणाऱ्यांच्या बेहिसेबी मालमत्तेची योग्य ती दखल घेऊन त्यांच्या भ्रष्टाचारी कृत्यांना जोपर्यंत आळा घातला जाणार नाही. तोपर्यंत समाजाचा पर्यायाने देशाचा विकास होणारच नाही. समाजात श्रीमंत-गरीब दरी कायम वाढतच राहील. अन्याय करणारे दोषी आहेतच पण अन्याय सहन करणारे त्याहून अधिक गुन्हेगार आहेत. आपण लाच दिलीच नाही, कायदेशीर मार्गाने हक्क प्राप्त करून घेतले तर अशा प्रवृत्तीला नक्कीच खीळ बसेल. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे व अपराध्याला पकडून देण्यासाठी यंत्रणांना मदत करणे आपले कर्तव्य आहे, तेंव्हाच खरी समाज उभारणी होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या व राष्ट्राची सेवा करणाऱ्या स्वयंसेवकांनी यातून बोध घ्यावा.``

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील होते. ते म्हणाले की, ``राष्ट्रीय सेवा योजना ही विधायक कार्य करून समाजाला योग्य दिशा देणारी व जागरूक नागरिक घडविणारी योजना आहे. युवकांनी आजपासून संकल्प करूया की मी भ्रष्टाचार करणार नाही व करणाऱ्यांना करूही देणार नाही, याची सुरुवात स्वतःपासून करू. हा भ्रष्टाचार मुक्तीचा संकल्प घरोघरी पोहोचवा असा संदेश त्यांनी दिला. स्वयंसेवकांनी श्रमदानाद्वारे परिसराची स्वच्छता केली.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. एस. पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले. यावेळी स्वयंसेवक व स्टाफ उपस्थित होता. डॉ. एन. के पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment