अथर्व प्रशासन व दौलत कामगार बैठकीत ठोस तोडगा नाही, १७ कामगारांना घरी बसून पगार देतो, पण कारखान्यात घेणार नाही - अथर्वची भुमिका, शुक्रवारी कामगारांची बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2022

अथर्व प्रशासन व दौलत कामगार बैठकीत ठोस तोडगा नाही, १७ कामगारांना घरी बसून पगार देतो, पण कारखान्यात घेणार नाही - अथर्वची भुमिका, शुक्रवारी कामगारांची बैठक

 

कोल्हापूर येथील बैठकीवेळी उपस्थित मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याच्या कामगारांच्या प्रश्नावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सर्कीट हाऊस मधील शाहु सांस्कृतिक सभागृहात शेतकरी, कामगार, तोडणी वाहतूकदार व अथर्व प्रशासनाची बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना पार पडली. यावेळी आम. राजेश पाटील, माजी मंत्री भरमुआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, संग्राम कुप्पेकर, अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे उपस्थित होते.
            प्रारंभी जिल्हा बॅकेचे अध्यक्ष तथा आमदार हसन मुश्रीफ यांनी कामगार व अथर्व व्यवस्थापनामध्थे समझोता करण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे सांगून प्रत्येकाने थोडक्यात म्हणणे मांडावे असे सुचविले. सुरवातीला कामगारांच्या वतीने सीटुचे प्रा.सुभाष जाधव यांनी अथर्व प्रशासन व कामगार यांच्यात झालेला वाद, पगारवाढ, बोनस, कामगारांना धमकावणे, कामगारांचे निलंबन, कामगारवर घातलेल्या केसेस याबाबत सविस्तर माहीती दिली. अथर्वच्या वतीने मानसिंग खोराटे यांनी अथर्वची बाजु मांडली. कामगारांंनीच कामगारांंना माराहाण केली आहे. त्यामुळे ५९ कामगारांना निलंबित केल्याचे सांगितले, मात्र जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कामगाराचे निलंबन मागे घेतल्याचे सांगितले. पण १७ कामगारांमध्ये इतर कामगारांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना कारखान्यात न घेता शेती विभागात बदली करणार असल्याचे सांगितले. यावर कामगारांनी अथर्व कंपनीकडून कामगारांना धमकावणे, मागील दोन वर्षांपासून २० कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर केलेले निलंबन, पगार कपात, बोनस, प्रशासनाला कंटाळून काही कामगारांनी सोडलेल्या नोकऱ्या, अथर्व ने आणलेले गुंड व या गुंडापासून कामगारांच्या जीवितास असलेला धोका  याबाबत आपली गाऱ्हाणी मांडली. 

    त्यानंतर शेतकरी, तोडणी वाहतूकदार यांनी आपली बाजु मांडली. सुमारे दीड तासाच्या चर्चेनंतरही  तोडगा निघाला नाही. त्यामुळे आमदार हसन मुश्रीफ यांनीच पुढाकार घेऊन आम. राजेश पाटील, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, गोपाळराव पाटील, सीटुचे प्रा. सुभाष जाधव, दौलत युनियन अध्यक्ष प्रदीप पवार, अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांना सभागृहाच्या आतील दालनात घेऊन चर्चा केली. दोन तासांच्या चर्चेतही काहीच निष्पन्न झाले नाही. पुन्हा सर्वजण सभागृहात आले. यावेळी पुन्हा मानसिंग खोराटे यांनी दोन दिवसात कारखाना सुरू करणार असुन ५३६ कामगारानी कामावर हजर रहावे. १७ कामगारांमुळे इतर कामगारांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना गेटच्या आत घेऊन मी काम करणार नाही. या १७ कामगारांना भले कामावर न घेताही पगार देतो, पण कारखान्यात घेणार नाही. अशी भुमिका घेतली. प्रा. सुभाष जाधव यांनी कामगार व अथर्व प्रशासन मध्ये लेखी करार करावा. सर्व मागण्या त्या करारात घ्याव्यात. तसेच १७ कामगारांच्या दृष्टिने अथर्व प्रशासनाची अव्यवहार्य भुमिका असून कामगारांना मान्य नाही. त्यामुळे  कामगारांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले. चार  तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतरही बैठकीत ठोस तोडगा निघाला नाही. यावेळी शांताराम पाटील, शंकर मनवाडकर, प्रदीप पवार, विष्णुपंत गावडे, अनिल होडगे, अशोक गावडे, तुकाराम पाटील, मारूती कदम, तानाजी गडकरी, विष्णू आढाव, रमेश पाटील, सुभाष देसाई आदींनी चर्चेत भाग घेतला. तर संजय पाटील, सचिन बल्लाळ, विष्णू जोशिलकर, कल्लाप्पा भोगण, डाॅ. हरिष पाटील, बबन देसाई, उदयकुमार देशपांडे, पृथ्वीराज खोराटे, तुकाराम बेनके, गोपाळ पाटील, भिमराव चिमणे, विशाल पाटील, महादेव वांद्रे यासह तालुक्यातील बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूकदार, कामगार व जिल्हा बॅकेचे अधिकारी उपस्थित होते.

 कारखाना व्यवस्थापनाच्या कामगार विरोधी भूमिकेमुळं कोल्हापूर येथे झालेली बैठक निष्फळ ठरली. या बैठक़ीबाबत जिल्हा बॅकेचे अध्यक्ष आम. हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं. उद्या शुक्रवार दि.११ रोजी कारखाना स्थळ गाडी अड्डा या ठिकाणी सर्व कामगारांची बैठक १ वाजता बोलवण्यात आली असून या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



No comments:

Post a Comment