'त्या'शिक्षकाला चंदगड ला हजर करून घेऊ नये, तालुक्यातील स्वंयसेवी संस्थाचे तहसीलदार याना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2022

'त्या'शिक्षकाला चंदगड ला हजर करून घेऊ नये, तालुक्यातील स्वंयसेवी संस्थाचे तहसीलदार याना निवेदन


चंदगड/प्रतिनिधी

मुलींशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिक्षकाला शिक्षा म्हणून चंदगड तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशा शिक्षकाला तालुक्यात हजर करण्यात येऊ नये अशी मागणी तालुक्यातील स्वयंसेवी संघटनांच्या वतीने  तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे  करण्यात आली आहे. तसेच जर हा शिक्षक हजर झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. निवेदनावर.ॲड.संतोष मळविकर , ॲड.एन. एस.पाटील,अश्विनकुमार पाटील, गणेश फाटक, मारुती गावडे माजी सरपंच (वाघोत्रे) व वसंत सोनार  (पाटणे) आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

       पोर्ले तर्फ ठाणे येथील कुमार-कन्या शाळेतील मुलींशी असभ्य वर्तन करणाऱ्या नामदेव मारूती पोवार (वय ४९) या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संशयित आरोपी शिक्षकाला शिक्षा म्हणून त्याची बदली चंदगडला केल्यामुळे तालुक्यात जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे. तसेच अधिकाऱ्यांनी चंदगड तालुका हा मागास म्हणून गुन्हेगारांना तालुक्यात पाठवण्याचा ठेका घेतला आहे का? असा संतप्त सवाल तालुक्यातून विचारला जात आहे. चंदगड तालुक्यात अधिकाऱ्यांच्या विरोधात संताप

संशयित आरोपी नामदेव पोवार याची चंदगडला बदली झालेली समजताच चंदगड वासियांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. जिल्ह्यात इतर तालुके असताना संशयित गुन्हेगार असलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी बदली चंदगड तालुक्यामध्येच का? असा प्रश्न विचारला जातोय. चंदगड तालुक्याला अजूनही दुर्गम आणि मागास संबोधणाऱ्या अधिकाऱ्यांचा सोशल मिडीयाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला जात आहे. चंदगड तालुक्यात आजही अनेक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याचे दिसून येते. तसेच तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयातील अनेक कर्मचारी मीटिंगच्या नावाखाली कार्यालयात गैरहजर दिसून येतात. यामुळे राजगोळी, शिनोळी, तुडये, कोलीक या ठिकाणाहून सर्वसामान्य लोकांना अनेकवेळा काम न करताच रिकाम्या हाताने परतावे लागते हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, या शिक्षकाविरोधत चौकशीला सुरुवात झाली असून धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. रविवारी शाळेला सुट्टी असताना तपास अधिकारी शैलेजा पाटील यांनी कन्या शाळेला भेट देऊन सविस्तर पाहणी केली. तर मुख्याध्यापकांकडे देखील सखोल चौकशी केली आहे. ग्रामपंचायतीने मंगळवारी संबधित शिक्षकाची शाळेत वागणूक चांगली नसल्याने त्याच्यावर कारवाई करावी अशा आशयाचे पत्र पोलिस, शिक्षण विभाग, पंचायत समितीला दिले होते.
No comments:

Post a Comment