अथर्व प्रशासन व कामगार वादात मध्यस्थी करण्याची प्रांताधिकाऱ्यांची तयारी, दौलत सभासद संघटनेची विनंती स्विकारली - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2022

अथर्व प्रशासन व कामगार वादात मध्यस्थी करण्याची प्रांताधिकाऱ्यांची तयारी, दौलत सभासद संघटनेची विनंती स्विकारली

 


 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना सभासद संघटना लि. हलकर्णीचे अध्यक्ष प्रा. विजयभाई पाटील, खा. धनंजय महाडिक युवा मंचचे  मायाप्पा पाटील अजित व्हाण्याळकर यांनी मंगळवार दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी गडहिंग्लजचे प्रांताधिकारी  बाबासाहेब वाघमोडे यांची गडहिंग्लज प्रांत कार्यालयात सायंकाळी भेट घेऊन अथर्व प्रशासन व कामगारांच्या वादात जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे शासकीय प्रतिनिधी या नात्याने मध्यस्थी करावी व वाद सामोपचाराने मिटवून दौलत साखर कारखाना तातडीने सुरु करण्याची प्रक्रिया कार्यान्वित करावी अशा  मागणीचे निवेदन दिले व चर्चा केली.

   यावेळी अध्यक्ष प्रा. विजयभाई पाटील  यांनी चर्चेत सांगितले कि अथर्व प्रशासन व कामगार आणि नेतेमंडळी, शेतकरी, सभासद यांच्या व्दिपक्षीय चर्चेतून वाद  मिटणे अशक्य झाले आहे. दि. २५ ऑक्टोबर पासून दि. १ नोव्हेंबर पर्यंत व्दिपक्षीय तीन मिटिंग झाल्या परंतु दोन्ही बाजूनी एकदम टोकाची भूमिका घेतली जात आहे. तसेच ६९ कामगारांचा निलंबनाचा मुद्दा हा वादाचा विषय ठरला आहे. त्यामुळे अथर्व प्रशासन गुंतवणुकीची रक्कम द्या. कारखाना सोडतो अशा  भूमिकेवर आहे. अथर्व प्रशासन व कामगार आणि नेतेमंडळींच्या एक हजार मिटिंगा जरी घेतल्या तरी दौलत कार्यस्थळावर तोडगा निघणारच नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी श्री रेखावार  व प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनीच तातडीने या वादात मध्यस्थी करावी व राज्य व जिल्हाधिकारी प्रशासनाव्दारे त्वरित मिटिंग दौलत कार्यस्थळ, चंदगड तहसील कार्यालय अथवा गडहिंग्लज येथे सकाळच्या वेळेत आयोजित करावी अशी विनंती केली. कोल्हापूर हे गैरसोईचे व दूरचे होते त्यामुळे कोल्हापूरला मिटिंग लावू नये अशी विनंती केली. त्यावेळी प्रांताधिकारी श्री बाबासाहेब वाघमोडेनी दौलत सभासद संघटनेच्या विनंतीस सन्मान देऊन चार नोव्हेंबर नंतर मिटिंग लावण्याची प्रक्रिया सुरु करू असे निवेदन स्वीकारून सांगितले.


 

No comments:

Post a Comment