कसा होतो शिवधर्म पद्धतीने विवाह...? मराठा, बहुजनांत शिव विवाहाचे वाढते आकर्षण - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2022

कसा होतो शिवधर्म पद्धतीने विवाह...? मराठा, बहुजनांत शिव विवाहाचे वाढते आकर्षणगारगोटी : सी. एल. वृत्तसेवा

          मराठा सेवा संघाच्या माध्यमातून  सुरू करण्यात आलेल्या शिवधर्म पद्धतीच्या शिवविवाहाचे आकर्षण मराठा व बहुजन समाजात दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच पद्धतीचा विवाह कुर, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथे नुकताच संपन्न झाला. विवाहाचे विधी पाहण्यासाठी पाहुणे व मित्रमंडळींसह परिसरातील ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने मंगल कार्यालयात उपस्थिती लावली होती.

          कोनवडे ता भुदरगड येथील शिवाजी पांडुरंग पाटील सध्या राहणार गारगोटी (मुख्याध्यापक, मराठी विद्या मंदिर सोनाळी) यांचे चिरंजीव योगेश व इंचनाळ, ता. गडहिंग्लज येथील सुभाष बंडू पाटील यांची कन्या सुप्रिया यांचा शिवविवाह शिवधर्म पद्धतीने करण्यात आला.

          राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमापूजनाने विवाह विधीची सुरुवात झाली. विवाह मंचावर वधू आणि वराच्या कुटुंबीयांनी ग्रंथ व पुष्प भेट देऊन एकमेकांचे स्वागत केले. मराठा सेवा संघ प्रणित विश्व शाहीर परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण व प्राजक्ता देसाई यांनी जिजाऊ वंदना गायीली. मंगलाष्टकांऐवजी शिव सप्तके झाल्यानंतर तांदळाच्या अक्षता ऐवजी पुष्प पाकळ्यांचा वर्षाव केला. वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात शिवमाला घालून दोघांनी प्रथम वैयक्तिकरित्या व नंतर दोघांनी एकत्रित एकनिष्ठतेची शपथ घेतली. 

            यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रवक्ता शहाजी देसाई यांनी शिवविवाह बद्दल माहिती सांगितली. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून विदर्भ मराठवाड्यात शिव विवाह बहुसंख्येने होतात. पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात त्यांची संख्या कमी असली तरी अलीकडच्या काळात शिवविवाहाचे आकर्षण वाढत आहे. अलीकडच्या काळात भुदरगड तालुक्यात शिवधर्म पद्धतीने सहा विवाह झाल्याचे देसाई यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व भागातून आलेले मान्यवर, परिसरातील ग्रामस्थ, पाहुणे, मित्रमंडळींचे शिवाजी पाटील यांनी आभार मानले. योगेश व सुप्रिया यांचा शिवधर्म पद्धतीने झालेला विवाह आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.  विवाहात कैताळ. घुमके, रणहलगी व शिंग-तुतारी ह वाद्यवृंद ही लक्षवेधी ठरले.No comments:

Post a Comment