होसूर येथे पाच घरे फोडली, रोख रक्कम, सोन्याचा दागिना लंपास - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2022

होसूर येथे पाच घरे फोडली, रोख रक्कम, सोन्याचा दागिना लंपास

 

होसूर : लीला आनंद नाईक यांच्या खोलीतील चोरट्यानी
फोडलेले लोखंडी कपाट

कागणी : सी. एल. वृत्तसेवा / एस. एल. तारीहाळकर 

कोवाड - बेळगाव मार्गावरील चंदगड व बेळगाव तालुक्याच्या सीमेला लागून असणाऱ्या होसूर (ता. चंदगड) येथे गुरुवारी मध्यरात्री नंतर पाच घरे फोडून रोख रक्कम व सोन्याचा दागिना लंपास केला आहे. 

होसूर : ग्रामपंचायतचे फोडण्यात आलेले लोखंडी कपाट.

     सध्या कोवाडे येथे राहणाऱ्या व मूळच्या होसूर च्या लीला आनंद नाईक यांचे होसूर येथे मुख्य गल्लीमध्ये घर आहे. या घरात तात्पुरते ग्रामपंचायत कार्यालय सुरू आहे. या ग्रामपंचायत मालकीची तीन लोखंडी कपाटे चोरट्यानी फोडली. लीला यांच्या खोलीतील एक लोखंडी कपाट, ट्रंक सुटकेस चोरट्यानी तोडून काही किमती आवाज मिळतो का ? याची चाचपणी केली आहे. तसेच यानंतर या ठिकाणापासून जवळच असणाऱ्या लक्ष्मी सहकारी दूध डेअरीमध्ये दरवाजाची कडी मोडून आत प्रवेश करून 3 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. 

      यानंतर ब्रह्म गल्ली येथे रंजना नागोजी हेबाळकर यांचे बंद असलेले घर फोडून सोनसाखळी लांबवली लंपास केली आहे. यानंतर नारगावडे बंधूंच्या देवघराचा  दरवाजा मोडून अर्धा किलो पितळेची देवाची मूर्ती चोरट्यानी लंपास केली. यामुळे परिसरातील नागरिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

होसूर : फोडण्यात आलेल्या घरांची पाहणी करताना पोलीस पाटील अमृतराव देसाई. शेजारी दिनकर राजगोळकर, ज्ञानेश्वर नाईक, अमृत मनीकिरे, सचिन पाटील, तानाजी बिर्जे व अन्य ग्रामस्थ.

कोवाड पोलीस चौकीचे अमोल देवकुळे, होसुर येथील अतिरिक्त कार्यभार असलेले कागणीचे पोलीस पाटील अमृतराव देसाई, सरपंच राजाराम नाईक यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने चंदगड येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे. होसूर गावच्या मध्यभागी चोरट्यानी मोठ्या धाडसाने ५ घरे फोडली आहेत. त्यामुळे परिसरात व गावाबाहेर  असणाऱ्या घरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


No comments:

Post a Comment