लोकायुक्त कायदा झाल्यास भ्रष्टाचाराला आळा बसेल - उपाध्यक्ष बालाजी कोम्पलवार, भ्रष्टाचार जनआंदोलन न्यासच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर - चंदगड लाईव्ह न्युज

04 November 2022

लोकायुक्त कायदा झाल्यास भ्रष्टाचाराला आळा बसेल - उपाध्यक्ष बालाजी कोम्पलवार, भ्रष्टाचार जनआंदोलन न्यासच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

कोल्हापूर येथे कायदेविषयक शिबिरात बोलताना राज्य उपाध्यक्ष बालाजी कोम्पलवार, बसलेले नारायण पोवार, राधेशाम जगताप, अल्लाउद्दीन शेख, भिकाजी कांबळे व बाजीराव पाटील आदी.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 
 राज्यात बोकळलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्रीय लोकपालवर आधारीत लोकायुक्त कायदा होणे गरजेचे आहे. हा कायदा करुन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास अधिकाऱ्यांबरोबरच भ्रष्टाचाराने बरबटलेले मंत्रीही शिक्षेपासून सुटू शकरणार नाही, असे मत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे राज्य उपाध्यक्ष बालाजी कोम्पलवार यांनी केले. जनआंदोलन न्यासच्या जिल्हा समितीच्या वतीने शाहू स्मारक भवन येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी न्यासचे राज्य सहसचिव अल्लाउद्दीन शेख होते.    
     पिंपळाच्या झाडाला मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून शिबिराला सुरुवात केली. यानंतर जाणकारांकडून नोकरीतील बदल्या, माहिती अधिकारी, ग्रामसभा, दप्तर दिरंगाई, महसूल अधिनियम, केंद्रीय लोकपालसंदर्भातील कायद्याची माहिती दिली. न्यासचे पुणे विभाग निरीक्षक राधेशाम जगताप यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्राणांतिक उपोषण करुन सरकारला करायला लावलेल्या कायद्यांची माहिती दिली. कोम्पलवार म्हणाले, की अण्णा हजारे व मुख्यमंत्री यांच्यामध्ये लोकायुक्त कायदा करण्यासंदर्भात तीन ते चारबैठका झाल्या. नंतर काही हालचाली झालेल्या नाहीत, ही खेदाची बाब असल्याचे सांगितले. शेख म्हणाले, कायद्यांबाबत दक्ष राहिलो नाही अथवा कायद्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्याची आर्थिक , सामाजिक घडीच विस्कटून जाईल, असा धोकाही शेख यांनी बोलून दाखवला. न्यासच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष नारायण पोवार म्हणाले, माहितीचा अधिकाराची निट अंमलबजावणी झाली नाही, अथवा त्याबाबत जनता दक्ष राहिली नाही, तर कायदा गुंडाळून ठेवला जाईल. यावेळी न्यासचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष मळवीकर (चंदगड), कोल्हापूर शहराध्यक्ष सुशील हंजे, करवीरचे अध्यक्ष विवेक देसाई, इचलकरंजीचे अभिजीत पटवा, प्रल्हाद सुतार व दीपक बंडगर उपस्थित होते. स्वागत सचिव बाजीराव पाटील यांनी केले तर खजिनदार भिकाजी कांबळे यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment