कुदनूर ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पंचरंगी लढत, २ बिनविरोध तर ९ जागांसाठी २५ जण रिंगणात..! तीन पॅनेल मध्ये जोरदार रस्सीखेच - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2022

कुदनूर ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पंचरंगी लढत, २ बिनविरोध तर ९ जागांसाठी २५ जण रिंगणात..! तीन पॅनेल मध्ये जोरदार रस्सीखेच


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         'चंदगड' मधील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव अशी ओळख असलेल्या कुदनूर ग्रामपंचायत निवडणुकीत तीन पॅनल मध्ये तिरंगी तर सर्वसाधारण महिला राखीव लोकनियुक्त सरपंच पदासाठी पंचरंगी लढत होत आहे. ११ जागांपैकी २ उमेदवार  बिनविरोध निवडून आले असून उर्वरित ९ जागांसाठी २५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

      राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील समर्थक श्री सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनल कडून सरपंच पदासाठी विजया बाळासो कोकितकर यांच्यासह सुखदेव शहापूरकर, सुजाता कांबळे, संतराम मोहनगेकर, भारती आंबेवडकर, लता बम्बर्गेकर, अशोक वडर, केदारी कसलकर, सचिन पवार, वर्षा मेणसे निवडणूक लढवत आहेत. या पॅनलच्या वार्ड क्रमांक २ मधून वनिता हेब्बाळकर तर वार्ड क्रमांक ४ मधून बाळव्वा गस्ती  बिनविरोध निवडून आल्या आहेत.


         येथील मूळचा माजी मंत्री भरमूअण्णा गट, भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील व भाजप समर्थक उद्योजक सुरेश घाटगे यांच्या श्री सिद्धेश्वर परिवर्तन आघाडी कडून सरपंच पदासाठी संगीता सुरेश घाटगे यांच्यासह मारुती दत्तू आंबेवाडकर, अश्विनी सुभाष बम्बर्गेकर, साधना गुंडकल, रामचंद्र पवार, रामचंद्र तळवार, मारुती बिर्जे, शालन चंद्रकांत कांबळे, बाबाजान कालकुंद्रीकर, सत्यापा नागाज, सुनिता मोहनगेकर नशीब आजमावत आहेत.

         तर बांधकाम ठेकेदार राजू रेडेकर व माजी जिप. अध्यक्षा पुष्पमाला जाधव यांच्या नेतृत्वाखाली कुदनूर खन्नेटी समविचारी आघाडी कडून सरपंच पदाच्या उमेदवार सरस्वती भरमू रेडेकर यांच्यासह अमृत कोले, अब्दुल राजेसाब मुल्ला, शंकर तवनोजी, सरिता संतोष राऊत, बाळाराम नागरदळेकर, सुनील मुतकेकर हे ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.  सरपंच पदासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या गीता दिलीप पवार व अपक्ष रेणुका विजय कोले या अन्य दोन उमेदवार आहेत.

          १९९० पूर्वीच्या वीस पंचवीस वर्षात लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार व जोतिबा खवणेवाडकर यांच्या सरपंच पदाच्या काळात राजकीय क्षेत्रात असलेला दबदबा, अलीकडच्या काही वर्षात विविध कारणांमुळे कुदनूर ची तालुक्यावरील सैल झालेली राजकीय पकड पुन्हा मजबूत करण्याचे आव्हान नव्या नेतृत्वाने पेलावे, अशी अपेक्षा कुदनूर चे मतदार बाळगून आहेत. 

No comments:

Post a Comment