मातृभाषा टिकवणारे देश जगात सर्वश्रेष्ठ - डॉ. सुनिलकुमार लवटे, चंदगड येथील फादर अग्नेल स्कुलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

23 December 2022

मातृभाषा टिकवणारे देश जगात सर्वश्रेष्ठ - डॉ. सुनिलकुमार लवटे, चंदगड येथील फादर अग्नेल स्कुलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

 चंदगड येथील फादर अग्नेल स्कुलमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात बोलताना  डॉ. सुनिलकुमार लवटे.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      पूर्वीचा काळ वेगळा होता. आता काळ झपाट्याने बदलत आहे. आई-वडिलांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आपल्या मुलांनी कोणत्याही स्पर्धेत पहिलेच यावे. अशी आई-वडिलांची धारणा झाली आहे. 

वार्षिक स्नेहसंमेलन

        आई- वडील आणि शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे खरे दिशादर्शक आहेत. आई-वडिलांनी ही आपल्या मुलांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये मतभेद न करता सर्व मुलांचा सर्वांगीण विकास करावा. 

         एखादा विद्यार्थी परीक्षेत पहिला येतो म्हणून त्या विद्यार्थ्याकडे लक्ष आणि शेवटी येतो त्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य आत्मसात  करण्याची गरज आहे. इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. जगाने ती स्विकारली आहे. 

        पण मातृभाषा शिकवणारे आणि ती टिकवणारे देश जगात आजही  सर्वश्रेष्ठ आहेत. हे ही विसरता कामा नये. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक, डॉ. सुनिल कुमार लवटे यांनी व्यक्त केले.

       चंदगड येथील फादर अग्नेल स्कूल चंदगड येथील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल  होते.    

     डॉ. सुनीलकुमार लवटे पुढे म्हणाले,``आम्ही लहान असताना स्नेहसंमेलनाकरिता पोशाखाची जुळवा जुळव करताना नाकीनऊ यायचे .... आता पूर्वीसारखा काळ राहिला नाही. 

  लहानपणातील शालेय मजा वेगळीच असते. पण विद्यार्थी लहानपणापासूनच घडवण्याचे काम हे शिक्षकांनी  केले पाहिजे. इतर देशांच्या तुलनेत भारतात म्हणावा तसा शैक्षणिक विकास आणि उठाव झाला नाही. फिनलँड, युरोप यासारख्या देशांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो. त्यांना मूल्य शिक्षणाचे धडे शिकवले जातात.

       प्रत्यक्षात कृतीतून शिक्षण  दिले जाते. त्यामुळे तिथे सर्वच विद्यार्थी पहिले येतात. विद्यार्थ्यांमध्ये दुजेभाव केला जात नाही, असेही त्यांनी या ठिकाणी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

      कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, आर्किटेक रूपाली पाटील, डॉ. सुनीलकुमार लवटे, मॅनेजर फादर लोनजनइस, फादर संतोष, फादर मारिओ, फादर कार्सन, फादर सेलवम, फादर मिलाग्रेस यांच्या हस्ते करण्यात आले. 

     मान्यवरांचे स्वागत व शालेय अहवालाचे वाचन मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल यांनी केले. यावेळी शाळेत राबवण्यात आलेल्या स्पर्धा व नियोजित कार्यक्रमांचाही आढावा घेतला. 

      चंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. 

        विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या व राज्य स्तरावरील क्रीडा व पेंटिंग स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली.  

         या कार्यक्रमात कोळीगीत, पंजाबीगीत नृत्य, शेतकरीगीत, शेतकरीनृत्य, मराठी महाराष्ट्र गीत नृत्य, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर, पोवाडा नृत्य, बॉलीवूड हिट्स धमाका, नृत्य वसुंधरा बचाव कचरा घटाव पथनाट्य मूकनाट्य देशाप्रती शहिदांना आदरांजली अशी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य व कला सादर करण्यात आली. 

     `जय जवान जय किसान` चा नारा देण्यात आला. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाने सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्मय, गायत्री, दुर्वा या शालेय विद्यार्थ्यांनी केले. यावेळी शिक्षिका वैष्णवी शिंदे व शुभांगी पाटील यांनी प्रेक्षकांना अभिवादन करून पालकांसह सर्वांचे आभार मानले. फादर अग्नेल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्कृष्टरित्या सादर केल्याबद्दल सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रिन्सिपल फादर विल्सन पॉल यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment