लकीकट्टे येथील चाळोबा मंदिरात दानपेटी फोडून ५० हजार रुपये लंपास, काही दिवसापूर्वी दयानंद रेडेकर यांचे दुकानही फोडले - चंदगड लाईव्ह न्युज

30 December 2022

लकीकट्टे येथील चाळोबा मंदिरात दानपेटी फोडून ५० हजार रुपये लंपास, काही दिवसापूर्वी दयानंद रेडेकर यांचे दुकानही फोडले

लकीकट्टे येथील चाळोबा मंंदिर

कागणी : सी. एल. वृतसेवा

         चंदगड आणि बेळगाव  तालुक्याच्या  सीमेवरील काही गावांमध्ये सातत्याने मंदिरफोडी तसेच घरफोडी होत आहे. लकीकट्टे येथे ११ महिन्यापूर्वी जीर्णोद्धार सोहळा झालेल्या बाहेरील चाळोबा मंदिराची दानपेटी फोडून बुधवारी रात्री सुमारे ६० हजार रुपये लंपस केले तर पंधरा दिवसांपूर्वी लकीकट्टे येथील दयानंद रेडेकर यांच्या किराणा दुकानाचा खिडकीचा दरवाजा मोडून पाच ते सहा हजार रुपये लंपास केले. यामुळे गावाबाहेरील असणारी घरे तसेच मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. गत फेब्रुवारी महिन्यात सुमारे २५ लाख रुपये खर्च करून चाळोबा मंदिर बांधण्यात आले आहे. 

चोरट्यांनी मोडलेला दरवाजाचा कुलूप व दानपेटी

         येत्या काही दिवसांमध्ये सदर दानपेटी फोडण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतला होता, मात्र त्यापूर्वी चार दिवसातच दानपेटी फोडून चोरट्याने पैसे लंपास केले आहेत. सदर मंदिर गावापासून अर्धा किलोमीटर दूर आहे. मंदिराचे पुजारी सिताराम पाटील व विलास थोरवत यांना प्रथम सदर घटना निदर्शनास आली. यानंतर त्यांनी गावकऱ्यांना याबाबतची माहिती दिली. चोरट्याने प्रथम दरवाजाचा कुलूप तोडून प्रवेश केला. यानंतर दानपेटीचा कुलूप मोडून त्यातील पैसे लंपास केले. 

             या घटनेनंतर  झालेल्या बैठकीला सरपंच संजीवनी पाटील, पोलीस पाटील दयानंद कांबळे, दयानंद रेडेकर, पुरुषोत्तम रेडेकर अशोक मरगुंडे, विजय धुमाळे यांच्यासह अन्य  मान्यवर उपस्थित होते. या पुढील काळात मंदिरांची सुरक्षा कशी राखावी, याबाबत चर्चा करण्यात आली. चंदगड व बेळगाव तालुक्याच्या सीमेवरील गावांमधून रात्री चंदगड पोलिसांनी गस्त घालावी, तसेच संशयस्पद व्यक्तीकडे चौकशी करावी अशी मागणी चंदगड तालुक्यातून होत आहे.

No comments:

Post a Comment