चंदगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अतिक्रमणे सरसकट काढा, ग्रामस्थांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2022

चंदगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अतिक्रमणे सरसकट काढा, ग्रामस्थांची मागणी



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील शासनाकडून निर्माण करण्यात आलेल्या वसाहतीतील रस्ते करताना नगरपंचायतीने आपला रस्ता शाबूत ठेऊन  सरसकट नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमणे काढावी, अशी मागणी चंदगडच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. 

      चंदगड गावातील काही तत्कालिन बेघरांना केवळ ७२ रुपयांच्या मोबदल्यात गावात घर मागणी नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेऊन प्लॉटचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये बेघराऐवजी अनेक धनदांडग्यांनी जागा मिळवल्या. खऱ्या गोरगरिबांवर अन्याय केला. वसाहतीच्या नावाखाली गरीब , मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी काढून घेतल्या. आता या वसाहती हायटेक होत आहेत. जमिनीला सोन्याचे मोल आले आहे. 

         चंदगड येथे नगरपंचायत झाल्यानंतर रस्त्याच्या कामात गती आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधली जात आहेत. ही गटारे बांधताना ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत, त्याची अतिक्रमणे काढली जात आहेत. आणि जे राजकीय संबंध प्रस्थापित करून समाजात वरमानेने वावरतात त्यांच्या प्लॉटसमोरील अतिक्रमणे न काढता ती नियमित करण्याकडे नगरपंचायतीचा कल आहे, हे सकृत दर्शनी निदर्शनास येते. म्हणून नगरपंचायतीने आपला रस्ता शाबूत राहिल, याची व्यवस्था करून संभाव्य अडचणीला कायमची मूठमाती देण्यासाठी सज्ज व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगरपंचायत हद्दीतील अतिक्रमणे सरसकट काढावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

No comments:

Post a Comment