पार्ले धनगरवाडा पेयजल योजनेत गैरव्यवहार, ग्रामस्थांचा आरोप - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2022

पार्ले धनगरवाडा पेयजल योजनेत गैरव्यवहार, ग्रामस्थांचा आरोप


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       पार्ले पैकी धनगरवाड्यावरील पेयजल योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत याप्रकरणी ठेकेदार, समिती सचिव, अध्यक्ष यांची चौकशी करून तत्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सखाराम फोंडे यांनी चंदगड पं स गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. 

       पार्ले पैकी धनगरवाडा येथे २०११/१२ मध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत झऱ्यावर आधारीत, लघु नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. 'आंब्याचे पाणी’ येथून धनगरवाड्यापर्यंत पाईपलाईन टाकली. ती खोदकाम न करता वरचेवर घातली होती. जेथे लहान ओहोळ आहेत. तेथे खोदकाम न करता पाईप घातलेले आहेत. तेथे कोणतेही पिलर बांधलेले नाहीत. जेथे पाण्याचा उगम स्त्रोत आहे. तेथे कोणतेही फिल्टर व्यवस्थापन नाही. सद्या नागरीकांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे. झऱ्यावरून पाणी येण्यासाठी पाईपच नाहीत. बांधलेली पाण्याची टाकी पूर्णपणे लिकेज आहे. जाग्यावर पाईपच नाहीत. सिमेंट टाकी फुटलेली आहे.

त्यामुळे सदर योजना पूर्णपणे खराब आहे. सदर योजना ७ लाख ४१ हजार रूपयांची होती. योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जाग्यावर योजनाच नसल्याने आजपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाने या योजनेचा तांबा घेतलेला नाही. त्यामुळे ठेकेदार, समितीचे अध्यक्ष व सचिव यांची चौकशी करून धनगर बांधवाना न्याय द्यावा. दोषीवर कारवाई करावी, अन्यथा धनगर बांधव उपोषण करणार असल्याचा इशारा सखाराम फोंडे, भागोजी फोंडे, ठकाजी फोंडे, सगुबाई फोंडे, धाकलू फोंडे, बाबू फोंडे, सिध्दू जानकर, सावी फोंडे, दिपाली फोंडे, सविता फोंडे, अंबूबाई जानकर, सोनाली फोंडे, सुषमा फोंडे, गंगुबाई फोंडे यांनी निवेदनातून दिला आहे. 

No comments:

Post a Comment