पारगड मोर्ले रस्ता प्रश्नी लेखी आश्वासन...! रघुवीर शेलार यांचे उपोषण मागे - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2023

पारगड मोर्ले रस्ता प्रश्नी लेखी आश्वासन...! रघुवीर शेलार यांचे उपोषण मागे

 

रघुवीर शेलार

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्हा सीमेवरील शिवकालीन पारगड किल्ला ते मोर्ले रस्ता प्रश्नी किल्ले पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार आपल्या सहकाऱ्यांसह २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी वन विभाग व बांधकाम विभागाच्या निषेधार्थ उपोषणास बसणार होते. तथापि भाजपा नेते, माथाडी कामगार युनियन अध्यक्ष व भाजप राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील यांची यशस्वी मध्यस्थी तसेच संबंधित मंत्री व अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करण्याच्या  लेखी आश्वासनानंतर शेलार यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचे सांगितले.
पारगड मोर्ले रस्ता प्रश्नी २६ जानेवारी २०२० रोजी चंदगड वनविभाग कार्यालय समोर उपोषणास बसलेले रघुवीर शेलार व त्यांचे सहकारी. (संग्रहित छायाचित्र, श्रीकांत पाटील यांच्या संग्रहातून)

  मोर्ले ते पारगड रस्ता दोडामार्ग व चंदगड तालुक्यात वन विभागाच्या हद्दीतून जातो. या वन क्षेत्रातून जाणारा रस्ता बांधकाम विभागाने मुदतीत पूर्ण करणे गरजेचे होते.  तथापि अधिकाऱ्यांच्या चालढकल वृत्तीमुळे तो अपूर्ण राहिला व वनविभागाने कामास मनाई केली. याप्रश्नी आत्तापर्यंत विक्रमी २९ आंदोलने होऊनही काम अपूर्णच राहिले. त्यामुळे पुन्हा प्रजासत्ताक दिनी उपोषणाचे अस्त्र उपसण्यात आले होते. शिवाजीराव पाटील यांच्या मध्यस्थीतून वनविभागाचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री व बांधकाम मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने शेलार व ग्रामस्थांनी उपोषण स्थगित केले आहे. तथापि महिन्यात कामाच्या हालचाली न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत.


No comments:

Post a Comment