आदिवासी हक्क बचाव महाआक्रोश मोर्चाला बहुसंख्येने उपस्थित राहा - प्रा. बसवंत पाटील यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2023

आदिवासी हक्क बचाव महाआक्रोश मोर्चाला बहुसंख्येने उपस्थित राहा - प्रा. बसवंत पाटील यांचे आवाहन

प्रा. बसवंत पाटील
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी , टोकरे कोळी , डोंगर कोळी, ढोर कोळी, जमातीवर महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून गेली ४० वर्षे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व वैद्यता  प्रमाणपत्र संदर्भात सुरू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळ, आदिवासी संघर्ष समिती, अखिल भारतीय कोळी समाज संघटना यांच्यावतीने २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित आदिवासी हक्क बचाव महा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रा. बसवंत पाटील, विभागीय अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, आदिवासी संघर्ष समिती व जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय कोळी समाज संघटना व  विजय भोजे, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळ यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. 

         १९५० पूर्वीच्या जातीच्या  पुराव्याचा आग्रह, आप्तसंबंधची अट, क्षेत्रिय निर्बंधची अट या कारणावरून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांकडून नाकारले जाते. वास्तविक महा. कायदा क्र २३/२००० मध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही अटींची तरतूद नाही.

        वस्तुतः विधान भवन पुणे यांचेकडील २० मार्च 1991च्या पत्रानुसार कोल्हापूर जिल्ह्यात केवळ कोळी महादेव जमात राहते यांची सन 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 30206 इतकी आहे. तथापि, माधुरी पाटील निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून कोल्हापूर जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव  जमातींला शासनाच्या सर्व सोयी व सवलती पासून  वंचित ठेवले जात आहे. याची खदखद आदिवासी समुदायामध्ये आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आदिवासी विद्यार्थी, महिला, शेतकरी, दिव्यांग या सर्व घटकांना महा आक्रोश मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या मोर्चाला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत. 

No comments:

Post a Comment