कालकुंद्री येथील श्रीकांत पाटील यांना 'महाराष्ट्र, गोवा लोक गौरव सन्मान' पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2023

कालकुंद्री येथील श्रीकांत पाटील यांना 'महाराष्ट्र, गोवा लोक गौरव सन्मान' पुरस्कार जाहीर

 

श्रीकांत पाटील

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार तसेच कला, पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'महाराष्ट्र, गोवा लोक गौरव सन्मान' पुरस्कार केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड चे मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील (कालकुंद्री ता. चंदगड) यांना नुकताच जाहीर झाला आहे. 

            कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या व्यक्ती व संस्था यांचा सन्मान या विभागामार्फत केला जातो. श्रीकांत पाटील हे उपक्रमशील, चतुरस्त्र व अष्टपैलू शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून जिल्ह्यात परिचित आहेत. शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष तसेच चंदगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी गेल्या ३७ वर्षात विविध संघटनात्मक तसेच राष्ट्राच्या जडणघडणीत सामाजिक क्षेत्रात उदात्त हेतूने केलेल्या कार्याची दखल पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली असून त्यांना या मानाच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांना महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार २०१०, स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार २०२०, महाराष्ट्र लोक रत्न सेवा पुरस्कार-२०२१, शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप राष्ट्रीय पुरस्कार-२०२२ अशा तीन राज्य व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

           पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार दि. २९ जानेवारी २०२३ रोजी 'कला नाट्य उत्सव मालवण - २०२३' बॅनर अंतर्गत मामा वरेकर नाट्यगृह मालवण सिंधुदुर्ग येथे स्वराज्य रक्षक संभाजी फेह अभिनेते अनिल गवस तसेच गोवा राज्य सांस्कृतिक मंत्री ना. गोविंद गावडे आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या निवडीबद्दल श्रीकांत पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment