पत्रकार दिन '२० फेब्रुवारी' तर '६ जानेवारी' हा दर्पण दिन म्हणून साजरा करावा..! पत्रकार परिषदेचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2023

पत्रकार दिन '२० फेब्रुवारी' तर '६ जानेवारी' हा दर्पण दिन म्हणून साजरा करावा..! पत्रकार परिषदेचे आवाहन


पुणे : सी. एल. वृत्तसेवा

       आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणून ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जात होता. तथापि नव्या संशोधनातून २० फेब्रुवारी १८१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावी जांभेकर यांचा जन्म झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे ६ जानेवारीला होणारा पत्रकार दिन  यापुढे २० फेब्रुवारीला साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने घेतला आहे. तर ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्रींनी दर्पण हे नियतकालिक सुरु केले होते. त्याचे स्मरण म्हणून '६ जानेवारी' हा 'दर्पण दिन' म्हणून सर्वत्र साजरा होणार आहे.

      पत्रकार व नागरिकांनी हा बदल जाणीवपूर्वक लक्षात घ्यावा व कार्यक्रमांचे आयोजन करावे. ६ जानेवारीला दर्पण दिन तर २० फेब्रुवारी रोजी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा द्याव्यात. असे आवाहन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख व पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

         बाळशास्त्री यांच्या गुगलवर पूर्वी दाखवलेल्या जन्मतारखेत सुद्धा आता बदल झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या तज्ञांच्या कमिटीत २० फेब्रुवारी १८१२ हीच जन्मतारीख संशोधनातून सिद्ध झाली आहे. त्यामुळे दरवर्षी २० फेब्रुवारी याच दिवशी पत्रकार दिन साजरा करण्याचे चार वर्षांपूर्वीच निश्चित झाले असले तरी अजून ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन समजून व्हाट्सअप वर या दिवशी पत्रकार दिनाच्या पोस्ट फिरत असतात. या बंद झाल्या पाहिजे. पुन्हा पुन्हा या चुका न करता '२० फेब्रुवारी' ह्याच दिवशी पत्रकार दिन साजरा करावा.' असे कळकळीचे आवाहन एस. एम. देशमुख यांनी केले आहे. चंदगड तालुका पत्रकार संघ गेल्या वर्षापासून या बदलाची कार्यवाही करत आहे. यंदाही करणार असल्याचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment