किल्ले पारगडवर 'ढाला' उत्सवाने वनदेवतेचा जागर - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2023

किल्ले पारगडवर 'ढाला' उत्सवाने वनदेवतेचा जागर



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगडवर 'ढाला' उत्सवाने वनदेवतेचा जागर व पूजन करण्यात आले. पूर्णपणे महिलांचा सहभाग असलेला दहा दिवसीय पारंपारिक वार्षिक उत्सव जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात साजरा केला जातो.
   छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ दरम्यान किल्ल्याच्या उभारणीनंतर गडाचे पहिले किल्लेदार रायाजी उर्फ रायबा मालुसरे यांना ५०० मावळे दिमतीला देत 'सूर्य चंद्र असेपर्यंत गड जागता ठेवा!' या दिलेल्या आदेशाला शिरसावंद्य मानून येथील मावळे गेली साडेतीनशे वर्षे  गडाचे प्राणपणाने रक्षण करत आहेत. ढाला प्रसंगी महाराजांच्या सदरेवर (सध्या गडावरील छत्रपतींच्या पुतळ्यालगत) वनदेवतेची स्थापना केली जाते. या परिसरात  महिला विविध प्रकारची  शिवकालीन हत्यारे घेऊन शिकारीला सज्ज होतात. अर्थात ही शिकार लुटूपुटूची असते. काही महिला व लहान मुले खोटे वन्य प्राणी बनतात त्यांची शिकार करून वनदेवतेला नैवेद्य दाखवला जातो. शेवटच्या दिवशी गावजेवण केले जाते. 
   गेल्या काही वर्षात नोकरी, उद्योग व्यवसाय निमित्त गडकरी अन्यत्र राहत असल्याने गडावरील राबता कमी आहे. तथापि यंदा बाहेर राहणाऱ्या लेकी, सुना मोठ्या संख्येने उत्सवासाठी प्रथमच गडावर गोळा झाल्या. आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या या उपक्रमामुळे  पारंपरिक ढाला ऐतिहासिक आनंदोत्सव बनला होता. यावेळी गावातील वृद्ध महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
   उत्सव सांगता प्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गडकऱ्यांना दुय्यम वागणूक देऊ नये. तसेच लोकप्रतिनिधी व राजकीय नेते, पुढारऱ्यांनी केवळ मतांचा विचार न करता या ऐतिहासिक किल्ला व परिसराच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशी मागणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार, प्रकाश चिरमुरे, प्रवीण चिरमुरे आदी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पारगड पंचक्रोशीतील नामखोल, मिरवेल आदी गावातही 'ढाला' साजरा करण्यात आला.



No comments:

Post a Comment