सिंदखेडराजा येथील जिजाऊ जयंती कार्यक्रमास 'चंदगड' मधून शिवप्रेमी रवाना - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2023

सिंदखेडराजा येथील जिजाऊ जयंती कार्यक्रमास 'चंदगड' मधून शिवप्रेमी रवाना


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मराठा सेवा संघ व त्यांच्या ३३ कक्षांच्या पुढाकाराने जिजाऊ सृष्टी सिंदखेडराजा (जिल्हा बुलढाणा) येथे उद्या १२ जानेवारी रोजी होत असलेल्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमासाठी चंदगड तालुक्यातून ६० शिवप्रेमी रवाना झाले. तालुक्याच्या विविध भागातून एकत्र झालेले शिवप्रेमी आज अडकूर (ता. चंदगड) येथून मार्गस्थ झाले.
 छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या मातोश्री जिजाऊ यांचे जन्म ठिकाण असलेल्या सिंदखेड राजा येथे ३ जानेवारी (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती) ते १२ जानेवारी जिजाऊ जयंती पर्यंत दशरात्रौत्सव दरवर्षी प्रचंड उत्साहाने साजरा केला जातो. गेल्या पंधरा-वीस वर्षात मराठा सेवा संघ व संघ प्रणित संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद, विश्व शाहीर परिषद आदी  कक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी सेवा देत असून महाराष्ट्रातून लाखो शिवभक्त, राजकीय पक्षांचे प्रमुख आमदार खासदार मंत्री आदी लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

हिंदवी स्वराज्य संस्थापक व स्वराज्य रक्षक शिवशंभु राजांना घडवणाऱ्या आदर्श मातेच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चंदगड तालुक्यातून मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री प्रशांत कुट्रे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष सदिप देसाई, उपाध्यक्ष  कमलाकर मंडलिक, सचिव  विजय आरदाळकर, तालुका संघटक नंदकुमार पाटील, कौशल्य बांदिवडेकर, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रकाश इंगवले, विष्णू कंग्राळकर, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे आदिंसह शिवप्रेमी  प्रथमच एकत्रित सिंदखेडराजा येथे रवाना झाले. या ऐतिहासिक सहलीत अनेक बालकांचा समावेश कौतुकास्पद आहे.

  जिजाऊंचे पिताश्री लखुजी राजे जाधव यांच्या ऐतिहासिक वाड्यावर जयंतीच्या मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर जिजाऊ सृष्टी पर्यंत शोभायात्रा, सायंकाळी  विराट सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या काळात भजन, कीर्तन आदींच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment