शाहूवाडीचा तो इंजिनीयर बनून आला देवदूत...! मुंबई येथे ताटातूट नंतर पाच वर्षांनी कालकुंद्रीच्या माय - लेकराची झाली भेट !! - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2023

शाहूवाडीचा तो इंजिनीयर बनून आला देवदूत...! मुंबई येथे ताटातूट नंतर पाच वर्षांनी कालकुंद्रीच्या माय - लेकराची झाली भेट !!

मारुती सिद्धाप्पा पाटील (कालकुंद्री)

कागणी /  एस. एल. तारीहाळकर / सी. एल. वृत्तसेवा

         कालकुंद्री (ता. चंदगड) येथील गतिमंद तरुण  मारुती सिद्धाप्पा पाटील हा खारघर, मुंबई येथून अचानकपणे बेपत्ता. त्याचे भाऊ कल्लाप्पा व भाऊजी ज्ञानदेव गुंडू मुरकुटे  (मुरकुटेवाडी, ता. चंदगड)  यांचेकडून  सर्वत्र शोधाशोध.  त्यानंतर मुंबई पोलिसात तक्रार. तो पुन्हा परतून येईल ही सोडून दिलेली आशा, या घटनेला पाच वर्षे झाली. मात्र  साळशी, बांबवडे (ता. शाहूवाडी, कोल्हापूर) गावचे सुपुत्र व हिंजवडी, पुणे येथे  सेरेटेक् ग्रुप कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या  प्रवीण पाटील यांच्यामुळे त्या  बेपत्ता तरुणाची आणि त्याच्या मातोश्रींची अखेर  पाच वर्षानंतर भेट झाली. 

इंजिनियर प्रवीण पाटील ( शाहुवाडी, कोल्हापूर व सध्या पुणे)

       याबाबत त्या बेपत्ता झालेल्या मारुती यांच्या आई सुशीला व त्यांचे भाऊ कल्लाप्पा यांची प्रजासत्ताकदिनानिमित्त भेट घेतली असता त्या म्हणाल्या, त्या इंजिनिअरच्या माध्यमातून मला देवच भेटला !!  त्या बेपत्ता तरुणाचे नाव आहे मारुती सिद्धाप्पा पाटील (वय ३६, राहणार यादव गल्ली कालकुंद्री, ता. चंदगड, कोल्हापूर). कोरोना काळात जागतिक महामारी असताना हा तरुण मोठमोठ्या मुंबई पुण्यासारख्या शहरात आपला बचाव करून कोठे राहिला?  त्याला आसरा कोणी दिला असेल? 

       या प्रश्नाचे आजही गुढ कायम आहे. हा दुःखदायक प्रसंग आणि त्यातून शेवटी आलेला सुखाचा क्षण हा मोठा विचित्र प्रवास  गावकऱ्यांना आश्चर्यचकित करून टाकणारा आहे. सदर बेपत्ता तरुण मारुती हा हिंजवडी, पुणे येथे औद्योगिक वसाहत मध्ये फिरताना आढळला. 

        याबाबत कालकुंद्री येथील बेपत्ता मारुती या तरुणाची आई सुशीला,  त्याचा भाऊ कल्लाप्पा यांनी, मला त्या  इंजिनीयरच्या माध्यमातून देवच भेटला! असे भावना उद्गार काढले. प्रवीण पाटील यांनी सोशल मीडियावर एक फोटो व त्याच्या गावचे नाव व मोबाईल नंबर टाकून मेसेज व्हायरल केला होता. मारुती हा गतीमंद असल्याने फक्त गावचे नाव सांगत होता, मात्र स्वतचे नावे सांगत नव्हता. 

       याबाबत अधिक माहिती अशी की, मूळच्या कलखांब (ता. बेळगाव) व सध्या 45 वर्षापासून कालकुंद्री येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्य करणाऱ्या सुशीला सिद्धाप्पा पाटील या आपल्या शेजारीन सुनीता वसंतराव पाटील यांच्यासह आपला मुलगा मारुती हे तिघे व कागणी व्यावसायिक दशरथ देसाई,  बुक्कीहाळ येथील काही संत निरंकारी बाबा यांचे भक्त मुंबईला १८ जानेवारी २०१८ रोजी गेले होते. खारघर येथील संत निरंकारी बाबा यांच्या सत्संग मेळाव्यातून यानंतर अचानकपणे लघु शंकेला जातो, असे सांगून बाहेर पडलेला मारुती त्या ठिकाणाहून बेपत्ता झाला होता. त्याचे वय ३६ असून त्याच्या शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्याचे भाऊ कल्लाप्पा व पुणे येथील अभियंता व त्याचे भाऊजी ज्ञानदेव गुंडू मुरकुटे (राहणार मुरकुटेवाडी, ता. चंदगड) यांनी विविध ठिकाणी शोध घेतला मात्र तो सापडला नाही. कलाप्पा यांनी बंगळूर, यशवंतपूर, हुबळी, धारवाड, नाशिक या ठिकाणी शोध घेतला तरीही तो मिळून आला नव्हता. 

       बांबवडे, साळशी (ता. शाहुवाडी) येथील अभियंता म्हणून पुणे येथे कार्यरत असणारे प्रवीण पाटील यांनी या मारुतीच्या फोटो सह सोशल मीडियावर पोस्ट केला, की सदर  तरुण कालकुंद्री या गावचा आहे असे सांगत आहे. कृपया ओळख असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन करून त्या आपला मोबाईल नंबर ही त्या मेसेजमध्ये घालून व्हायरल केला होता.   हा मेसेज काही दिवसांनी कालकुंद्रे येथे पोहोचला यानंतर बेपत्ता मारुतीचे भाऊजी ज्ञानदेव गुंडू मुरकुटे (रा. मुळगाव, मुरकुटेवाडी, चंदगड व सध्या पुणे) यांना सांगितल्यानंतर त्यांनी थेट त्या घटनास्थळावर जाऊन त्याला ताब्यात घेतले यानंतर त्याच्यावर चार दिवस दवाखान्यामध्ये उपचार करून  त्यांचे भाऊ कल्लाप्पा यांच्या ताब्यात त्याला सुपूर्द केले.

       आज-काल हाय प्रोफाईल मध्ये जगणारे लोक एका वाटसरूची चौकशी करत नाहीत, मात्र शाहूवाडीच्या त्या इंजिनीयरने त्याचा फोटो काढून त्याचा फोटो सोशल मीडियावर टाकून मेसेज मध्ये आपला स्वतःचा नंबरही दिला. या त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे आज त्यांचा मुलगा त्याच्या  आई जवळ आला. प्रवीण पाटील यांच्या  यांच्यासारखी माणसे समाजात फार कमीच आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीला सी. एल. लाईव्ह चा सलाम ! 

No comments:

Post a Comment