बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गाचा महामार्ग व्हावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

29 January 2023

बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गाचा महामार्ग व्हावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 

स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना महामार्गाबाबत निवेदन देण्यात आले.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         सर्वसोयींयुक्त बाजारपेठ, आरोग्य, शैक्षणिक, उद्योग केंद्र असलेले बेळगाव चंदगडसह, आजरा, गडहिंग्लज, दोडामार्ग,  सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण येथील लोकांसाठी महत्वाचा असलेला बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गाचा महामार्ग व्हावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

   बास्केट ब्रीजच्या पायाभरणीसाठी केंद्रीय मंत्री गडकरी रविवारी कोल्हापुरात आले होते. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानावर यांच्यासह शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. बेळगाव हे औद्योगिक, ऐतिहासिक, पर्यटनशील तसेच सर्वसोयींयुक्त बाजारपेठ, आरोग्य, शैक्षणिक, उद्योग केंद्र आहे. देशातील एक महत्त्वाचे लष्करी केंद्रही बेळगावात आहे. त्यामुळे चंदगडसह आजरा,  गडहिंग्लज, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण येथील लोक विविध कामानिमित्त बेळगाव रोज ये-जा करत असल्याने या रस्त्यावर मोठी रहदारी असते.    

        त्यामुळे बेळगाव-वेंगुर्ला हा १८० क्रमांकाचा राज्यमार्ग कोल्हापूर, सिंधुदुर्ग व कर्नाटकातील बेळगाव जिल्हा तसेच जुना हायवे पुणे-बेंगळूर एनएच-४, एनएच-१७ पणजी-मुंबई या महामार्गाला जोडणारा कॅरिडाॅर आहे. वेंगुर्ला ते बेळगाव १२३.२ किलोमीटर असून यामध्ये महाराष्ट्रातील हद्द ११०.८ किलोमीटर व कर्नाटकात १४.०९ किलोमीटर आहे. त्यामुळे हा राज्यमार्ग महामार्ग होणे आवश्यक आहे. हा महामार्ग झाल्यास शेतीमाल, भाजीपाला, किराणामाल, कोकणातील हापूस आंबा, सागरी भागातील मच्छीची ने-आण करणे सुकर होणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनाद्वारे शशिकांत रेडेकर, शिवाजी भोगण, अजित तुरटे, यशवंत इंजल, दत्तात्रय मोहिते, सुयोग जाधव, विवेक बिल्ले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

साखर निर्यातीसाठीही लाभदायक

         गोव्याला जाताना आंबोली हा घाटमार्ग सुरक्षित असून साखर निर्यातीसाठी कोकणातील रेड्डी बंदर, दोन्ही राज्यातील प्रवाशांसाठी गोवा व सिंधुदुर्गच्या सरहद्दीवरील चिपी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सोयीचे होणार आहे. त्यामुळे या राज्यमार्गाचा महामार्ग होणे गरजेचा आहे.

No comments:

Post a Comment