![]() |
संग्रहित छायाचित्र |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड ते बेळगाव या रस्त्यावर होसूर जवळील लहानशा घाटामध्ये सायंकाळ होताच गव्यांचा वावर सुरू झाला आहे. महिपाळगड जंगलातून सदर गव्यांचा कळप हा किटवाड कडील धरणाकडे जातो. रोज सायंकाळी जातो आणि रोज पहाटे पुन्हा परत हा गळ्यांचा कळप महिपाळगड जंगलाकडे जातो. महिपाळगड जंगल परिसरातील पाण्याचा साठा संपत आल्यानंतर सदर गव्यांचा कळप पाण्यासाठी होसूर घाट रस्ता ओलांडून पुढे किटवाड (ता. चंदगड) येथील धरणाकडे रवाना होतो.
गत अनेक वर्ष हा त्यांचा उन्हाळ्यामध्ये दिनक्रम ठरलेला आहे. अशावेळी प्रवाशांनी वाहने हळू चालवून सुरक्षा बाळगणे गरजेचे आहे. दोन दिवसापूर्वी कालकुंद्री येथील दीपक कालकुंद्रीकर व बंडू सुतार हे बेळगावला गेले होते, परतत असताना सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यासमोर गव्यांचा कळप अचानकपणे त्यांच्या समोर आला. मात्र कोणतीही दुर्घटना घडली नाही.यापूर्वी काही वेळेला कळप सोडून मागे राहिलेले गवे दुपारच्या सत्रातही संचार करत असताना अनेक वेळा निदर्शनास आले आहे. दोन वर्षांपूर्वी बेळगाव कडे जात असताना भर दुपारी बारा वाजता होसूर घाटात कागणी येथील पत्रकार संदीप तारीहाळकर यांच्या दुचाकीलाही गव्याने धडक दिल्याने दुचाकीला अपघात झाला होता. त्यामुळे सायंकाळी व रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन सी. एल. न्यूज नेटवर्क कडून सर्व प्रवाशांना करत आहोत.
No comments:
Post a Comment