चंदगड ते दोडामार्ग मार्ग प्रश्नी १० जानेवारी रोजी होणारे उपोषण स्थगित, हेरे ते मोटणवाडी - कोदाळी मार्गावर अखेर रस्त्यावर पाणी मारायला तसेच कामाला सुरुवात - चंदगड लाईव्ह न्युज

08 January 2023

चंदगड ते दोडामार्ग मार्ग प्रश्नी १० जानेवारी रोजी होणारे उपोषण स्थगित, हेरे ते मोटणवाडी - कोदाळी मार्गावर अखेर रस्त्यावर पाणी मारायला तसेच कामाला सुरुवात


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           दोडामार्ग ते चंदगड मार्गावर हेरा ते मोटणवाडी कळसगादे तिलारीनगर कोदाळी या रस्त्याचे रूंदीकरण दूरूस्ती डांबरीकरण आदी कामाला सुरुवात करण्यात आली होती. पण हे काम संथ गतीने सुरू होते. शिवाय रस्त्यावर पाणी व्यवस्थित मारले जात नव्हते. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. दूचाकी वाहन धारकांना नागरीकांना याचा ञास सहन करावा लागत होता. पण संबंधित अधिकारी कंपनी ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील नागरीक सामाजिक कार्यकर्ते यांनी १० जानेवारी रोजी चंदगड बांधकाम कार्यालय येथे उपोषणाचा इशारा दिला होता. या पाश्र्वभूमीवर कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे १० जानेवारी रोजी होणारे उपोषण  स्थगित करण्यात आले आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते पत्रकार तुळशीदास नाईक यांनी दिली.

           दोडामार्ग ते चंदगड मार्गावर गोवा तसेच बेळगाव कोल्हापूर,पुणे तसेच इतर राज्यातील पर्यटक गोव्यात जाण्यासाठी येण्यासाठी या जवळच्या मार्गाचा वापर करतात. सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी हेरा ते मोटणवाडी कळसगादे तिलारीनगर कोदाळी या ठिकाणी रस्ता रूंदीकरण दूरूस्ती डांबरीकरण कामे हाती घेतली आहेत.यातील काही कामे ठेकेदार तर काही कंपन्या करत आहेत .पण हे काम कासवाच्या गतीने सुरू  होते.

           रस्त्याचे काम करताना  रस्त्यावर पाणी मारले जात नव्हते. तर एका बाजूने रस्ता डांबरीकरण पूर्ण न करता थोडा थोडा डांबरीकरण केला जात होता. याचा फटका वाहन धारकांना बसत होता  धुळी मुळे दूचाकी चालवणे अवघड झाले होते. मोठे वाहन गेल्यावर संपूर्ण धुळ मोटार सायकल चालवणाऱ्याच्या पाठीमागे असलेल्या इसमावर उडून संपूर्ण कपडे धुळीने माखले जात होते.

        जनतेला होणारा ञास या पार्श्वभूमीवर दोडामार्ग येथील काही सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांनी १० जानेवारी रोजी चंदगड सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय येथे उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. उपोषणाची दखल घेत संबंधित अधिकारी यांनी तातडीने संबंधित ठेकेदार कंपनी यांना आदेश देऊन तातडीने रखडलेल्या कामाला सुरुवात करुन पाणी मारायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी चार पाण्याचे टँकर लावले आहेत. शिवाय डांबरीकरण सुरू केले आहे. त्यामुळे लोकांना वाहन धारकांना  दिलासा मिळाला आहे. 

       संबंधित इंजिनिअर तसेच बांधकाम विभाग कर्मचारी यांनी घटनास्थळी कशा प्रकारे पाणी मारले जात आहे. हे दाखवून दिले तसेच कामाचा दर्जा योग्य राखला जात आहे. लवकरच काम झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण काही ठिकाणी आता स्थानिक शेतकरी आपली जमीन जाते असे सांगून कामात आडकाठी आणली जात आहे. तर काही ठिकाणी वन विभाग यांनी काम  रोखले आहे. तर काही ठिकाणी शेतकरी रस्त्यावर झोपून काम अडवत आहेत. बांधकाम विभाग संपादीत जमीन असूनही या अडचणीचा सामना करावा लागत आहे असे संबंधित इंजिनिअर शाखा अभियंता यांनी सांगितले.

        हेरा ते मोटणवाडी कळसगादे तिलारीनगर कोदाळी मार्गावर काम सुरू आहे अशा ठिकाणी दिवसाला तीन वेळा पाणी मारायला सुरुवात केली आहे. दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन कामाला सुरुवात केली आहे. लवकरच डांबरीकरण करुन एका बाजूने वाहतूक सुरळीत चालू करण्याचे संबंधित अधिकारी इंजिनिअर यांनी घटनास्थळी मान्य केले. त्यामुळे १० जानेवारी रोजी होणारे उपोषण दोडामार्ग तालुक्यातील नागरीक ग्रामस्थ तुळशीदास नाईक सामाजिक कार्यकर्ते यांनी रद्द केले आहे.

No comments:

Post a Comment