'लंपी स्कीन' ने चार जनावरे दगावली, पशुपालकांत घबराट - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2023

'लंपी स्कीन' ने चार जनावरे दगावली, पशुपालकांत घबराटकालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        कालकुंद्री (ता. चंदगड) येथे गेल्या पंधरा दिवसात 'लंपी स्कीन' रोगामुळे ३ गायी व १ बैल अशी चार जनावरे दगावल्याने संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 'लंपी स्कीन' रोग गेला अशी धारणा झालेल्या शेतकरी वर्गात या सलग घटनांमुळे पुन्हा घबराटीचे वातावरण पसरले आहे.

       सुरुवातीस गावातील रमेश भरमू पाटील यांची एक गाय या रोगास बळी पडली. आठवडाभरात त्याच गोठ्यात बांधलेली त्यांची दुसरी गाय बाधित होऊन मृत्युमुखी पडली. रोज दहा ते पंधरा लिटर दूध देणाऱ्या गाईंची किंमत  प्रत्येकी ७० हजार रुपयेच्या पुढे होती. गायीच्या दुधावर प्रपंच असलेल्या रमेश यांच्यावर यामुळे संकटाचा डोंगर कोसळला आहे. याशिवाय गावातील धोंडीबा गणपती पाटील यांचा ५० हजार रुपये किमतीचा बैल, तर शंकर लक्ष्मण जाधव यांची ५० हजार रुपये किमतीची गाय 'लंपी स्कीन' ने मृत्यू पावली. तिन्ही जनावरे पंधरा दिवसात बळी पडल्यामुळे गाय, बैल मालकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

    चारही घटनांचा पंचनामा शासकीय स्तरावर करण्यात आला. यावेळी तलाठी एस. व्ही. मुंडे, जि. प. पशुवैद्यकीय अधिकारी विनायक पाटील, ग्रामसेवक दत्ता नाईक, पोलीस पाटील संगीता कोळी, कोतवाल शशिकांत सुतार यांच्यासह पंच उपस्थित होते. दगावलेल्या जनावराचा पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने दूध उत्पादक व पशु पालकांनी रोगाची लागण होण्यापूर्वीच खबरदारीचे उपाय योजावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:

Post a Comment