चंदगड मध्ये रंगणार `पत्रकार व ऑफिसर्स क्रिकेट लीगचा` थरार...! पत्रकार संघ आयोजित स्पर्धेत १८ संघांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2023

चंदगड मध्ये रंगणार `पत्रकार व ऑफिसर्स क्रिकेट लीगचा` थरार...! पत्रकार संघ आयोजित स्पर्धेत १८ संघांचा सहभाग

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती तथा पत्रकार दिनानिमित्त (जन्मदिन- २० फेब्रुवारी १८१२) मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने 'पत्रकार व ऑफिसर्स प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

क्रिकेट स्पर्धेच्या नियोजन बैठकीत बोलताना न्यायाधीस ए. सी. बिराजदार, सहाय्यक न्यायाधीश चारुदत्त शिपकुले व अॅड. सुरुतकर,

   तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेल्या  १८ संघानी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. 
बैठकीला उपस्थित असलेले टीमचे प्रमुख व खेळाडू

    तहसील कार्यालय चंदगड येथे दिवाणी न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. १) झालेल्या नियोजन बैठकीत स्पर्धेचे लॉट्स व तारखा जाहीर करण्यात आल्या.
    
सहभागी संघांची ए. बी. सी. डी. इ. एफ. अशा ६ गटात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील तीन संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. यातील  विजेते ६ संघ पुढील फेरीत खेळतील. यातून २ विजेते संघ अंतिम सामना खेळतील. 

        स्पर्धेसाठीची गट विभागणी

'ए' गट- आरोग्य विभाग, वकील असोशिएशन, खेडूत स्पोर्ट्स.               

'बी' गट- तहसिल कार्यालय, पोलिस ठाणे, प्राथमिक शिक्षक. 

'सी' गट- एल आय सी इंडिया, तलाठी व कोतवाल, एसटी महामंडळ.

'डी' गट- पत्रकार संघ, महावितरण, न्यायालय. 

'ई' गट- पोलिस पाटील संघटना, कृषि विभाग, पंचायत समिती. 

'एफ' गट- बँक ऑफ इंडिया, नगरपंचायत चंदगड, वन (फॉरेस्ट) विभाग. 

           

          स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण २५ सामने होणार असून ते ११ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत (शासकीय सुट्टी दिवशी) होतील. शनिवार ११ रोजी राज्य व राष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीत उद्घाटन व ६ साखळी सामने, दि. १२ व १८ रोजी प्रत्येकी ६ साखळी सामने, २५ व २६ फेब्रुवारी रोजी उपांत्य फेरी, अंतिम सामना तसेच बक्षिस वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

      नियोजन बैठकीचे स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी केले. प्रास्ताविक संपत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन चेतन शेरेगार यांनी तर आभार उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी मानले. 
                   
       बैठकीस चंदगड न्यायालयाचे सहाय्यक न्यायाधीश चारुदत्त शिपकुले, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, वैद्यकीय अधिकारी अरविंद पठाणे आदींसह १८ पैकी १६ संघांचे कर्णधार, खेळाडू, पत्रकार उपस्थित होते.

     मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या चंदगड तालुका पत्रकार संघामार्फत तालुक्यात अशा प्रकारची स्पर्धा प्रथमच होत आहे. 

         स्पर्धेबाबत नागरिकांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून ही स्पर्धा संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धा जाहीर झाल्यापासून गेल्या महिनाभरात सर्वच संघांनी जोरदार सराव सुरू केला असल्याचे चित्र आहे.

No comments:

Post a Comment