इनाम सावर्डेत सोमवारी व मंगळवारी महाआरोग्य शिबिर, भाजप प्रदेश कार्यकरणी सदस्य शिवाजीराव पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2023

इनाम सावर्डेत सोमवारी व मंगळवारी महाआरोग्य शिबिर, भाजप प्रदेश कार्यकरणी सदस्य शिवाजीराव पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, शिवाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून चंदगड तालुका भाजपतर्फे सोमवार दि. २७  व मंगळवार दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचे उद्घाटन केंद्रीय विमान वाहतूक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजपा नेते शिवाजीराव पाटील व माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

       सोमवारी दुपारी ३ वाजता शिनोळी येथे केंद्रीय मंत्री शिंदे यांचे आगमन होणार असून त्यानंतर बसर्गे येथे जलजीवन योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथे शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानासमोर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन व केंद्रीय योजनांचे लाभार्थी यांच्याशी ते थेट संवाद साधणार आहेत. त्यानंतर नेसरी सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक भेट, आजरा येथे आण्णाभाऊ साठे हायस्कूलमध्ये नवमतदार संवाद मेळावा तसेच गडहिंग्लज येथेही पीएम किसान योजना लाभार्थींशी संवाद साधणार असल्याची माहिती भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी दिली. 

          या शिबिरात वेगवेगळ्या आजारांच्या तपासण्या तज्ञ डॉक्टरांच्यामार्फत रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया शासनाच्या योजनांच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, शांताराम पाटील, अशोक कदम, गणेश फाटक, किशोर बेल्लद, केतन बेल्लद व रविंद्र बांदिवडेकर, अनिल शिवनगेकर, बाबू परीट, अँड. विजय कडूकर उपस्थित होते. तरी या महाआरोग्य शिबिराचा चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन चंदगड तालुका भाजपाच्या वतीने  केले आहे.

No comments:

Post a Comment