प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवून देश पुढे जाणार नाही...! - आमदार राजेश पाटील त्रैवार्षिक अधिवेशनात शिक्षक संघाची नवी कार्यकारिण जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

25 February 2023

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवून देश पुढे जाणार नाही...! - आमदार राजेश पाटील त्रैवार्षिक अधिवेशनात शिक्षक संघाची नवी कार्यकारिण जाहीर

 

चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक संघ त्रैवार्षिक अधिवेशनात बोलताना आमदार राजेश पाटील.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
   प्राथमिक शिक्षकांमुळेच बाल वयात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम होतो. राष्ट्राची पुढची पिढी घडवणाऱ्या अशा शिक्षकांचेच अनेक प्रश्न प्रलंबित ठेवल्यास देश पुढे जाणार नाही. असे प्रतिपादन चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (वरुटे गट) शाखा चंदगडच्या त्रैवार्षिक अधिवेशनात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील, राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील उपस्थित होते.
   छत्रपती शिवाजी महाराज व शिक्षक नेते माजी आमदार कै शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिमा पूजन व राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  अध्यक्ष रमेश हुद्दार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सरचिटणीस दस्तगीर उस्ताद यांनी केले. आपल्या भाषणात पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले इंग्रजी माध्यम शाळांच्या मागे लागून शासकीय, जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था होत आहे. गोरगरीबांच्या या शाळा टिकल्या नाहीत तर पुढे मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागू शकते. हे पालकांनी वेळीच ओळखले पाहिजे. शासनाने अशा शासकीय शाळा सर्व सुविधांनी सुसज्ज करण्याबरोबरच शिक्षकांचा एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले. भरमूआण्णा यांनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात कोवाड, नेसरी, चंदगड व गडहिंग्लज ला महाविद्यालये दिल्यामुळे उपविभागातील गोरगरीब शेतकऱ्यांची मुले शिक्षण प्रवाहात राहिली असे सांगितले. यावेळी गोपाळराव पाटील, शिक्षक नेते राजाराम वरुटे, राज्य कोशाध्यक्ष संभाजी बापट, जिल्हाध्यक्ष बी एस पाटील- कोनवडेकर, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर, जिल्हा सरचिटणीस डी पी पाटील, स्मिता डिग्रजे, केंद्रप्रमुख शामराव पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास महादेवराव वांद्रे, शी. ल. होणगेकर, वसंत जोशीलकर, एस के शिंदे आदींची उपस्थिती होती. 
    यावेळी शिक्षक संघाची चंदगड तालुका नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्ष म्हणून शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शिवाजी पाटील, सरचिटणीसपदी सटुप्पा फडके, कार्याध्यक्ष विनोद कोरवी, कोषाध्यक्ष रमेश नाईक, उपाध्यक्ष महादेव सांबरेकर, दीपक गोरे, आप्पाजी भाऊराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर उस्ताद,  ग. स. पाटील तर महिला आघाडी अध्यक्षपदी प्रमिला कुंभार, सरचिटणीस मनीषा गावडे, कार्याध्यक्ष जयश्री बांदिवडेकर, कोषाध्यक्ष दीपा सुतार, उपाध्यक्ष रेणुका सुतार व चंदा घसारी यांच्यासह नव्या पदाधिकाऱ्यांना निवड पत्रे देण्यात आली.  देव वैजनाथ पतसंस्था चेअरमन भरमू तारीहाळकर यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment