माध्यमिक शिक्षकांना बीएलओ आदेश, विरोध होण्याची शक्यता - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2023

माध्यमिक शिक्षकांना बीएलओ आदेश, विरोध होण्याची शक्यता



तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      ऐन परिक्षेच्या धामधूमीत माध्यमिक शिक्षकांना मतदान केद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) चे आदेश शासन कडून काढण्यात आल्याने माध्यमिक शिक्षकाकडून संतापाची लाट उसळली आहे. या सर्व प्रकाराला माध्यमिक शिक्षकांकडून विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

        माध्यमिक विभागाकडील शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामांना सामोरे जावे लागत आहे. प्राथमिक विभागाकडील सांस्कृतिक स्पर्धाना परीक्षक, क्रीडा स्पर्धाना पंच अशी कामे करावी लागत आहेत. अशातच इ.५वी शिष्यवृत्ती व इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षांचे पर्यवेक्षक व ज्यादा तास, विज्ञान प्रदर्शन, शालेय क्रीडा स्पर्धा याच बरोबर दररोजचे वर्गातील शालेय अध्यापन करावे लागते. १० फेब्रुवारी २०२३ पासून इ.१० वी तोंडी व प्रात्यक्षिक बोर्ड परीक्षा असे कामकाज चालणार आहे. परीक्षेनंतर  पेपर तपासणीचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. काही ज्येष्ठ शिक्षकांना  मॉडरेटर म्हणून काम करावे लागणार आहे. एका बाजूने समाजात शिक्षकांकडून चांगल्या निकालाची अपेक्षा ठेवली जात आहे. या अशैक्षणिक कामांमुळे  दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. या सगळ्या कामामधून B. L. O. कामकाजासाठी वेळ मिळणे अशक्य आहे. यातच काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या काही शिक्षकांनाही असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामूळे याचा विचार करून माध्यमिक  शिक्षकांची BLO ची नियुक्ती रद्द करावी असा सुर आहे. मतदान केंद्रस्तरीय  अधिकारी (BLO)चे आदेश रद्द करण्या संदर्भात संबधीत विभागाला चंदगड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघ चंदगड व चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक संघ याच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment