देवरवाडी येथे मारहाणीत महिला जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2023

देवरवाडी येथे मारहाणीत महिला जखमीचंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      देवरवाडी (ता. चंदगड) येथे घराच्या मागील मोकळ्या जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीत सौ. रेखा नेताजी चलवेटकर (रा. हंगरगा तालुका जिल्हा बेळगाव, सध्या राहणार देवरवाडी) ही महिला जखमी झाली. ही घटना २० फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता घडली. याबाबतची फिर्याद जखमी महिलेने स्वतः चंदगड पोलिसात दिली आहे. याप्रकरणी आरोपी उमेश विठ्ठल भातकांडे (रा. देवरवाडी) याच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम ३३७, ५०४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

   याबाबत चंदगड पोलिसातून समजलेली हकीगत अशी, फिर्यादी रेखा यांचे वडील मारुती भातकांडे व आरोपी उमेश यांचे घरा पाठीमागील जागेवरून गेल्या सहा महिन्यापासून वाद सुरू आहे. सोमवार दि. २० रोजी सकाळी आरोपी उमेश हा मारुती भातकांडे यांच्या मालकीचे तार कंपाऊंड फावड्याने तोडत असताना रेखा चलवेटकर, मारुती भातकांडे, कोणेरी भातकांडे असे तिघे आरोपी यास कंपाऊंड तोडू नको असे समजावून सांगत असताना आरोपी उमेश याने शिवीगाळ करत त्यांच्यावर दगड फेकून मारला. हा दगड फिर्यादी रेखा यांच्या पायाला लागून ती जखमी झाली. तिने चंदगड पोलीस ठाण्यात हजर राहून दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या आदेशानुसार पोहेकॉ सुतार व पोलीस नाईक शिंदे घटनेचा अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment