चंदगड पत्रकार संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेत महावितरण, तहसील कार्यालय, एलआयसी संघांची आगेकूच - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2023

चंदगड पत्रकार संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेत महावितरण, तहसील कार्यालय, एलआयसी संघांची आगेकूच

उद्घाटनाच्या सामन्यात तहसील कार्यालय व डॉक्टर असोसिएशन संघातील खेळाडूंची ओळख करून घेताना प्रमुख पाहुणे डॉ. परशराम पाटील, न्यायाधीश अमृत बिराजदार, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, नायब तहसीलदार हेमंत कामत व पत्रकार संघाचे पदाधिकारी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त मराठी पत्रकार परिषद संलग्न 'चंदगड तालुका पत्रकार संघ' आयोजित 'पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३' स्पर्धेत महावितरण, एलआयसी इंडिया व चंदगड तहसील कार्यालय यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून आघाडी घेतली आहे.
शनिवार दि ११ फेब्रुवारी पासून माडखोलकर महाविद्यालय चंदगड च्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन केंद्र शासनाचे कृषी सल्लागार डॉ परशराम पाटील यांच्या हस्ते झाले. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन चंदगड कोर्टाचे न्यायाधीश ए सी बिराजदार यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी केले. उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगतात या आगळ्यावेगळ्या स्पर्धा आयोजनाबद्दल चंदगड पत्रकार संघाचे अभिनंदन करतांना सहभागी सर्व संघातील खेळाडू व चंदगड तालुक्यातील जनतेने क्रिकेटचा आनंद लुटावा असे आवाहन केले. आभार अनिल धुपदाळे यांनी मानले.
  उद्घाटनाच्या पहिल्या सामन्यात तहसील कार्यालय चंदगड ने डॉक्टर असोसिएशनवर विजय मिळवला. याशिवाय शनिवारी झालेल्या इतर सामन्यात प्राथमिक शिक्षक 'अ' टीमने एसटी महामंडळवर, महावितरण ने महा-ई-सेवा संघावर, एलआयसी इंडियाने पाटणे वनविभाग संघावर तर खेडूत स्पोर्ट्स ने सहकार पतसंस्था फेडरेशन टीमवर विजय मिळवले.
    रविवार दि. १२ रोजी दोन मैदानावर ११ सामने पार पडले.  हिंडाल्को मैदानावर झालेल्या ५ सामन्यात चंदगड पोलीस टीमने आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन वर, महावितरण ने एसटी महामंडळ वर, बँक ऑफ बडोदा ने पंचायत समिती संघावर, चंदगड न्यायालय ने एसटी महामंडळ वर तर प्राथमिक शिक्षक 'ब' ने सहकारी पतसंस्था फेडरेशन टीमवर रोमहर्षक विजय मिळवले. माडखोलकर महाविद्यालय क्रीडांगणावर झालेल्या ६ सामन्यात पंचायत समिती चंदगड ने पाटणे वन विभाग वर, एलआयसी इंडियाने बँक ऑफ बडोदा वर, डॉक्टर असोसिएशन टीमने आरोग्य विभाग वर, तहसील कार्यालय चंदगडने बँक ऑफ इंडिया वर, महावितरणने पोलीस पाटील संघटना टीमवर तर बँक ऑफ इंडिया ने पत्रकार संघावर विजय मिळवले.
सर्वच संघांत शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी असल्यामुळे स्पर्धा शासकीय सुट्टी दिवशी घेण्यात येत आहे. २४ संघात होणाऱ्या ४५  सामन्यांपैकी उर्वरित सामने १८, १९, २५ व २६ फेब्रुवारी रोजी दोन्ही मैदानांवर खेळवले जाणार आहेत.
   दुर्लक्षित हिंडाल्को मैदान चार दिवसात क्रिकेट खेळण्यायोग्य भव्य व सुरक्षित बनवण्यासाठी अथक परिश्रम घेऊन पूर्ण केल्याबद्दल चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या लोकाभिमुख कार्याबद्दल त्यांचा चंदगड पत्रकार संघाच्या वतीने न्यायाधीश माननीय ए सी बिराजदार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


No comments:

Post a Comment