१२ वी बोर्ड परिक्षेला प्रारंभ, विद्यार्थी गोंधळलेल्या स्थितीत - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2023

१२ वी बोर्ड परिक्षेला प्रारंभ, विद्यार्थी गोंधळलेल्या स्थितीत

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून घेण्यात येणाऱ्या १२ वी बोर्ड परिक्षेला इंग्रजी विषयाच्या  पेपरने सुरवात झाली. कोरोणा मुळे १० वी बोर्ड परिक्षा देता न आलेले विद्यार्थी थेट १२ वी बोर्ड परिक्षेला आल्याने  गोंधळलेल्या अवस्थेत होते. तर परिक्षा केंद्रावर संपूर्ण अनोळखी पर्यवेक्षक आल्याने व प्रश्न पत्रिकेतील चुकामूळे त्यांच्या गोंधळात आणखीणच भर पडली.

        इंग्रजीचा पहिला पेपर बदललेल्या नवीन नियमाने घेण्यात आला. सकाळी ९ पासून सर्वच केंद्रावर पालक व विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. पण विद्यार्थ्यांना १०. ३० वाजताच परिक्षा हॉल मध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी बोर्डाने संपूर्ण पर्यवेक्षण पद्धतीत बदल केला होता. परिक्षा केंद्रावर परिसरातील पर्यवेक्षकांची नेमणूक न करता दूरच्या पर्यवेक्षकांची नेमणूक केल्याने केंद्रावर अत्यंत कडक वातावरण होते.

         कोरोणा काळामध्ये १० वी बोर्ड परिक्षा झाली नव्हती तीच बॅच आता १२ वी ची बोर्ड परिक्षा देत असल्याने विद्यार्थी तणावाखाली असल्याचे दिसून आले. 

१२ वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांच्या चुका, प्रश्नांऐवजी छापून आली चक्क ‘मॉडेल आन्सर`

       इयत्ता १२ वीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांसाठी विचारलेल्या प्रश्नांऐवजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत. दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचेच झाले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

         फेब्रुवारी २०२३ या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून पहिला पेपर इंग्रजी भाषेचा होता. इंग्रजी विषयाकरिता ८० गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्न क्रमांक ३ मध्ये १४ गुणांसाठी कवितेवर आधारित प्रश्न विचारले जातात. आजच्या प्रश्नपत्रिकेत a-३,a-४, a-५ या तीन कृतींमध्ये प्रश्नांऐवजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत सापडले. काही विद्यार्थ्यांनी तर गोंधळून प्रश्नांची उत्तरे लिहिलीच नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने तयार केलेल्या ‘मॉडेल आन्सर’ मधील a-३, a-४, a-५ ही उत्तरे सूचानासह जशीच्या तशीच कृतिपत्रिकेत छापून आली आहेत.


No comments:

Post a Comment