कवी कुसुमाग्रज म्हणजे मराठी साहित्यातील एक रत्न. - श्री. शिवणगेकर, बागिलगे-डुक्करवाडी विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये राजभाषा दिन - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2023

कवी कुसुमाग्रज म्हणजे मराठी साहित्यातील एक रत्न. - श्री. शिवणगेकर, बागिलगे-डुक्करवाडी विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये राजभाषा दिन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          मराठी साहित्यातील आजरामर असे लेखन करून मराठी भाषा समृद्ध करण्याचे कार्य कवी, नाटककार, लेखक कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर यांनी केले असून त्यानी निर्माण केलेले मराठी साहित्य आजही मराठी भाषेला एका वेगळा उंचीवर नेऊन ठेवण्याचे सामर्थ्य निर्माण करते.कवी कुसुमाग्रज म्हणजे मराठी साहित्यातील एक रत्न आहे असे मत कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सदस्य एम. एन. शिवणगेकर यांनी व्यक्त केले. मराठी राज्यभाषा दिनानिमित्त बागिलगे-डुक्करवाडी विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. एस. तुर्केवाडकर हे होते.

        सुरुवातीला आर. जी. शिवणगेकर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एस. एस. तुर्केवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना शिवणगेकर म्हणाले मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक म्हणून कुसुमाग्रजांची ओळख होती. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतील महत्त्वाचे लेखक मानले जात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असेही केले जाते. साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे ते मराठीतील दुसरे साहित्यिक आहेत. चार दशकापेक्षा अधिक काळ प्रभाव गाजणारे त्यांचे साहित्य आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरणारे आहे असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर ए. बी. नाईकवाडी, के. टी. चिंचणगी, व्ही. एन. मुंगारे, जे. एम. मजुकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. व्ही. पाटील यांनी केले तर आभार श्रीमती व्ही. जे. कालकुंद्रीकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment