![]() |
व्याख्यानमालेत बोलताना महादेव शिवणगेकर |
कार्वे / सी. एल. वृत्तसेवा
"आजची पिढी सोशल मीडियाच्या मृगजळात अडकून आहे, तरुणाईच्या हातातील मोबाईलने पुस्तकांची जागा घेतली घेतली आहे. वाचन संस्कृती लोप पावताना दिसत आहे. या तरुणाईच्या हातात पुस्तकं येणे अत्यंत गरजेचे आहे. वाचन हा मानवी जीवनाचा उध्दार करणारा धागा आहे. त्यामुळे संस्कारांचा समतोल वाचनाने साधता येईल." असे प्रतिपादन मराठी अध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष महादेव शिवनगेकर यांनी व्यक्त केले.
ते मौजे कारवे (ता. चंदगड) येथील सरस्वती वाचनालयाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत "वाचाल तर वाचाल" या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. वाचनालयाचे अध्यक्ष द. य. कांबळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रकाश दुकळे यांनी करून दिला.
श्री. शिवणगेकर वाचनाचे महत्व अधोरेखित करताना पुढे म्हणाले की, "आपल्या आजूबाजूला दिसणारी महान व्यक्तिमत्त्व ही वाचनाने घडलेली आहेत. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा समाजातील तरुणाई भांडणे, मारामाऱ्या, वाद यातच अडकून पडेल. एकेकाळी स्त्रियांना शिक्षणाची दारं बंद होती. त्या महिला शिकू लागल्या, वाचू लागल्या. त्यामुळे त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आपल्याला समृध्द व्हायचं असेल तर आपल्याला वाचनाची कास धरावीच लागेल."
कार्यक्रमाला सरपंच जोतिबा आपके, मांडेदुर्ग गावचे सरपंच विनायक कांबळे, सूर्याजी ओऊळकर, बी. आर. फार्नांडिस, नारायण पाटील, काजमिल फर्नांडिस, हणमंत नाईक व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ॲड. कार्तिक पाटील यांनी केले. तर जॉनी फर्नांडिस, हेमिल फर्नांडिस,चंदा कांबळे आणि सुरेश कांबळे यांनी संयोजन केले.
No comments:
Post a Comment