जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यारी केंद्रं नष्ट झाली पाहिजे - डॉ. टी. ए. कांबळे, कारवे येथे सरस्वती वाचनालयाच्या व्याख्यानमालेस प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

22 February 2023

जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यारी केंद्रं नष्ट झाली पाहिजे - डॉ. टी. ए. कांबळे, कारवे येथे सरस्वती वाचनालयाच्या व्याख्यानमालेस प्रारंभ

मौजे कारवे (ता. चंदगड) येथील सरस्वती वाचनालयाच्या व्याख्यानमालेत बोलताना डॉ. टी. ए. काबंळे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

      बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश  स्वतःच्या कृतीतून जगासमोर मांडला. त्यांच्यामुळेच  समाजाला गुलामगिरीची जाणीव झाली. प्रत्येक जातींमध्ये सुध्दा अंतर्गत भेदभाव आहे.  हा भेदभाव आपण जोपर्यंत दूर करीत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अपेक्षित समाज घडवू शकणार नाही. त्यासाठी जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यारी केंद्रं नष्ट झाली पाहिजे."  असे प्रतिपादन डॉ. टी. ए. कांबळे यांनी केले. त्यांनी मौजे कारवे (ता. चंदगड) येथील सरस्वती वाचनालयाने  आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत 'सांगावा डॉ. बाबासाहेबांचा..' या विषयातून प्रथम पुष्प गुंफले. लोकनियुक्त सरपंच माधुरी संतोष सावंत - भोसले (उत्साळी) यां अध्यक्षस्थानी होत्या. 

      कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला.  व्याख्यानमालेचे  उद्घाटन उद्योजक विक्रमसिंह सुरेशराव चव्हाण - पाटील यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक सूर्याजी ओऊळकर यांनी तर पाहुण्यांचा  परिचय  डॉ. प्रकाश दुकळे यांनी करून दिला. 

        डॉ. कांबळे पुढे म्हणाले की, ''सांगावा म्हणजे आपल्याच माणसांनी आत्मीयतेने दिलेला संदेश होय. बाबासाहेबांनी कठीण परिस्थितीतून शिक्षण घेतले. अस्पृश्यता निवारण करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, समता -बंधुता प्रस्थपित व्हावी यासाठी घेतलेले कष्ट महत्वाचे ठरले. माता रमाईंची  बाबासाहेबांना मिळालेली साथ आणि त्यांचा त्याग यातून बाबासाहेबांना बळ मिळाले." 

        यावेळी सरपंच जोतिबा आपके व राहुल पाटील, द. य. कांबळे, बी. आर. फार्नांडिस, हणमंत नाईक व इतर  मान्यवरांची बहुसंख्य उपस्थिती होती . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ॲड. कार्तिक पाटील यांनी केले. तर जॉनी फर्नांडिस आणि सुरेश कांबळे यांनी संयोजन केले.

No comments:

Post a Comment