अपुरे पोलीस कर्मचारी प्रश्नी २० रोजी शिवसेनेची निदर्शने - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2023

अपुरे पोलीस कर्मचारी प्रश्नी २० रोजी शिवसेनेची निदर्शने



चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
        कोवाड (ता. चंदगड) पोलीस ठाण्यात तात्काळ पुरेसे कर्मचारी नेमावे या मागणीसाठी शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी कोवाड येथे निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत चे निवेदन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना देण्यात आले.
     चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील ५०- ६० गावातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चंदगड पोलीस ठाणे अंतर्गत पन्नास वर्षांपासून कोवाड येथे पोलीस दुरुक्षेत्र कार्यरत आहे. हा परिसर पूर्वीपासून संवेदनशील मानला जात. त्यातच कर्नाटक राज्य सीमेलगत असल्यामुळे त्या अनुषंगाने येणारे शेकडो अवैध धंदे, अवैध वाहतूक, तस्करी, चोऱ्या, दरोडे, विविध कारणास्तव होणाऱ्या मारामाऱ्या आदी वाढती गुन्हेगारी प्रकरणे पाहता गेल्या अनेक वर्षांपासून येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी सुरू आहे. असे असताना पोलिस प्रशासनामार्फत येथे पूरेसे पोलीस कर्मचारी दिले जात नाहीत मात्र आहेत ते कर्मचारीही चंदगडला ड्युटीवर लावले जातात अशी स्थिती आहे. बहुतांश वेळा येथे कोणीच कर्मचारी नसल्याने किरकोळ कारणासाठीही नागरिकांना चंदगडला हेलपाटे मारावे लागतात. यात नागरिकांना हाल व आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. हे टाळण्यासाठी येत्या २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत येथे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व पुरेसा स्टाफ न नेमल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, संपर्कप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली उग्र निदर्शने केली जातील असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर, उपतालुकाप्रमुख विनोद मनोहर पाटील, तुर्केवाडी विभाग प्रमुख संदीप गोपाळ पाटील, युवा सेना प्रमुख विक्रम मनगुतकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख अवधूत भुजबळ, आदींच्या सह्या असून यावेळी अनिरुद्ध कुट्रे, माणगाव विभाग प्रमुख उत्तम सुरतकर, बांधकाम सेना अध्यक्ष उमाजी पवार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment