हलकर्णी महाविद्यालयात 'शेतकरी मेळावा' व 'कृषी प्रदर्शन'उत्साहात संपन्न : शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2023

हलकर्णी महाविद्यालयात 'शेतकरी मेळावा' व 'कृषी प्रदर्शन'उत्साहात संपन्न : शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


चंदगड / प्रतिनिधी 
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 'शेतकरी मेळावा' व 'कृषी प्रदर्शनाचे' आयोजन करण्यात आले होते. 
     चंदगड तालुका निसर्ग संपन्न आणि वैभव संपन्न आहे. मातीशी प्रामाणिक राहून काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी महाविद्यालयाला नेहमीच आस्था  आहे. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महाविद्यालयात शेतकरी मेळावा कृषी प्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील उपस्थित होते. 
  शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आधुनिक नांगराची पूजा करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, दौलत विश्वस्त संस्थेचे आजी माजी संचालक,  प्रकाश राऊत, उमेश पाटील, प्रभाकर खांडेकर, जे. बी. पाटील, प्राचार्य. डॉक्टर. बी. डी.   अजळकर, जगन्नाथ हुलजी, विलास पाटील, शिवाजी सावंत, विष्णू गावडे, उदय देशपांडे, विजयकुमार जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी या शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचा हेतू समन्वयक डॉक्टर ए. व्ही. पाटील यांनी  प्रास्ताविकांतून विशद केला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून 'ऊस लागवड आणि खत व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रकाश राऊत म्हणाले, "आपण चंदगड मध्ये आहोत हे आपले भाग्य आहे. उत्तम पिक घेण्यासाठी योग्य नियोजन करा. खते, पाणी किती प्रमाणात पिकाला आवश्यक असते ते जाणून घ्या. पाचटाचा वापर शेतात चांगला होतो. जमिनीत जिवाणू टिकून राहिले पाहिजेत. शेणखत, खते, बेनं यांचा योग्य वापर व्हावा.शेतातील पिके ही एक जीव आहेत. ती आपल्याकडे  काही मागत नाहीत परंतु आपण त्यांच्या गरजा ओळखाव्यात संतुलित आहार व सगळे इतर घटक पिकाला आवश्यक असतात."
तर 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष -2023' या विषयावर बोलताना उमेश पाटील म्हणाले, "भारतीय संस्कृतीत तृणधान्याला अधिक महत्त्व आहे. पूर्वी नाचणी, बाजरी, गहू हे खाऊन माणसे तंदुरुस्त होती. कारण यातून आवश्यक घटक मिळतात. पर्यावरण संतुलन ही समस्या निर्माण होत आहे. कारण अनेक कारणामुळे विविध प्रदूषणे जन्म घेत आहेत. नाचणी सारख्या घटकांमध्ये शक्तीवर्धक अंश आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाची जबाबदारी. वाढते तापमान ही चिंचेची बाब ठरत आहे."
 गोपाळराव पाटील म्हणाले की "उत्तम नियोजन करून शेती केल्यास अधिक फायदा मिळेल. तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करा व प्रगती साधा."
यावेळी महाविद्यालयात कृषी पंढरी अवतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. हा कार्यक्रम खास शेतकरी बांधवांसाठी आयोजित केला होता. विविध भागातून शेतकरी या मेळाव्याला उपस्थित राहिले होते. त्यांनी कृषी प्रदर्शनातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. शेतीची प्रगती आणि शेतीतील प्रयोग याची सविस्तर माहिती यावेळी त्यांना देण्यात आली तर कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना पूरक माहिती प्राप्त झाली. या कृषी प्रदर्शनात विविध प्रकारच्या कृषी क्षेत्राला संबंधित आवश्यक गोष्टींची मांडणी कृषी स्टॉल वर मांडण्यात आले होते. खते,बी बियाने,तन नाशके, कीटकनाशके,सेंद्रिय उत्पादने, ट्रॅक्टर, नाचणी उत्पादने, शेती अवजारे आधी इतर वस्तूंचे स्टॉल विविध कंपनी आणि व्यवसायिकांनी लावले होते. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. पाटील व आदी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सर्व शेतकऱ्यांना शेतीशी निगडित सर्व बाबींची माहिती व्हावी यासाठी युवराज मारुती पाटील, रामदास पाटील, रामचंद्र आंबोलकर, मोहन पाटील, बाळाराम गडकरी, अजिंक्य सावंत, सचिन पाटील, युवराज विश्वास, पाटील सागर चिखलकर, ऋषिकेश सावंत, नितीन सुभेदार, गणपती पवार, दिलीप पाटील, व आदींनी स्टॉल लावले होते. याचा लाभ सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी घेतला. 
   याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, भागातून आलेले सर्व शेतकरी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन आयोजनाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले व समाधान व्यक्त केले.  उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला. प्राध्यापक जी. जे. गावडे यांनी सूत्रसंचालन केले तर समन्वयक डॉ. राजेश घोरपडे यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment