शासकीय शाळांच्या प्रगतीसाठी दानशूर व्यक्ती, संस्थानी पुढे यावे...! - युवराज पाटील, कोवाड येथे गंगामाई फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना बक्षीसे - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2023

शासकीय शाळांच्या प्रगतीसाठी दानशूर व्यक्ती, संस्थानी पुढे यावे...! - युवराज पाटील, कोवाड येथे गंगामाई फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना बक्षीसे

 

केंद्र शाळा कोवाड येथे पालक परिषदेत मार्गदर्शन करताना युवराज पाटील, सोबत चंद्रकांत कुंभार, मायाप्पा पाटील, दयानंद सलाम आदी मान्यवर

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

        जिल्हा परिषद सारख्या शासकीय शाळांच्या प्रगतीसाठी केवळ शासनावर विसंबून चालणार नाही. अशा शाळांना भौतिक व शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी दानशूर व्यक्ती संस्था व पालक यांनी पुढे आले पाहिजे. तरच शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीस गती मिळेल. असे प्रतिपादन रॉयलचे प्रमुख युवराज पाटील यांनी केले. ते केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड, ता. चंदगड येथे विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष रामा यादव होते.

मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना गंगामाई फाउंडेशनचे पदाधिकारी व मान्यवर

       रुवातीस संत गाडगे महाराज व कोवाड येथील साहित्यिक कै पांडुरंग कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी घेण्यात आलेल्या पालक परिषदेत युवराज पाटील यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगताना आपली मुले मुली मार्गाला लागणार नाहीत याची दक्षता पालकांनी घ्यावी असे आवाहन केले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम यांनी कोवाड व्यापारी संघटनेमार्फत शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. शाळेत मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना कुंभार समाज, गंगामाई फाउंडेशन व माजी उपसरपंच चंद्रकांत कुंभार यांच्यावतीने शालेय साहित्य व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यापुढेही आपण शाळेच्या प्रगतीत मौलिक योगदान देणार असल्याचे यावेळी कुंभार यांनी सांगितले. 

        यावेळी कुंभार समाजाचे अध्यक्ष सुनील कुंभार, प्रा. ए टी पाटील, धनंजय महाडिक युवा शक्ती तालुकाध्यक्ष मायाप्पा पाटील, विजय सोनार, केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर आदींची समयोचित भाषणे झाली. उपस्थित पालकांना अध्यापिका भावना अतवाडकर, मधुमती गावस, श्रीकांत आप्पाजी पाटील यांनी निपुण भारत अंतर्गत उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांना कला व संस्कृती संचालनालय गोवा सरकार तसेच कला, पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती सिंधुदुर्ग यांचा 'महाराष्ट्र गोवा लोक गौरव सन्मान पुरस्कार' मिळाल्याबद्दल गंगामाई फाउंडेशन च्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विनायक कुंभार, विष्णू जोशी, संजीवनी भोगण, राजेंद्र पाटील, उज्वला नेसरकर आदींसह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता पाटील यांनी केले तर गणपती लोहार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment