पुस्तके कधीच जुनी होत नाहीत - जयसिंग तोगले, कालकुंद्रीत वाचनालयाचा वर्धापनदिन - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2023

पुस्तके कधीच जुनी होत नाहीत - जयसिंग तोगले, कालकुंद्रीत वाचनालयाचा वर्धापनदिन

कालकुंद्रीत वाचनालयाचा वर्धापनदिन

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचा ११ वा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक रा. ना. पाटील गुरुजी होते.

   प्रास्ताविक अध्यक्ष के. जे. पाटील यांनी केले. यावेळी जान्हवी विश्वास पाटील, अक्षरा सर्जेराव पाटील, निशाद संदीप पाटील, समिक्षा विठोबा मुंगूरकर या शिष्यवृत्तीधारक व समिक्षा धनंजय पाटील या नवोदय परीक्षेत सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा वाचनालयाच्यवतीने सत्कार करण्यात आला. सन२०२२-२३ चा "उत्कृष्ट वाचक सन्मान" कु प्राची मारुती माडूळकर हिला देण्यात  आला. वाचनालयाला वर्षभर वर्तमानपत्रे, साप्ताहिके, भेटवस्तू व आर्थिक सहकार्य करणाऱ्या देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे किणी येथील युवावाचक जयसिंग राणबा तोगले यांनी मनोगतातून वाचकांना प्रोत्साहित केले. "जीवनात पुस्तकांचे महत्त्व अनन्य साधारण आहे पुस्तके कधीच जुनी होत नसतात, आजच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा." असे विचार व्यक्त केले. लेखक के. जे. पाटील यांनी 'सुडाग्नी' ही पहिलीच कादंबरी लिहिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

       यावेळी बंडू तोगले, नारायण पाटील, महानंदा पाटील, विठोबा मुंगूरकर, सुदर्शन पाटील, दीपक कालकुंद्रीकर, सुरेश नाईक, विनायक कांबळे , कोमल शेटजी आदींची उपस्थिती होती. वाचनालयाचे पदाधिकारी शिवाजी खवणेवाडकर, शिवाजी पाटील, पी.एस्.कडोलकर, प्रा. व्ही. आर. पाटील, विलास शेटजी, वंदना पाटील यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन विनायक कांबळे यांनी केले. आभार युवराज पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment