निट्टूर- घुल्लेवाडी मार्गावरील मोरीची उंची पावसाळ्यापूर्वी वाढवा अन्यथा आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

06 March 2023

निट्टूर- घुल्लेवाडी मार्गावरील मोरीची उंची पावसाळ्यापूर्वी वाढवा अन्यथा आंदोलन

निट्टूर- घुल्लेवाडी दरम्यानच्या याच मोरीवरून पावसाळ्यात पाणी वाहत असते.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
 पाटणे फाटा ते कोवाड मार्गावरील निट्टूर- घुल्लेवाडी दरम्यानच्या धोकादायक मोरीची उंची यंदाच्या पावसाळ्यापूर्वी न वाढवल्यास रास्ता रोको आंदोलन  करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  मोरी व रस्त्याच्या कमी उंचीमुळे पावसाळ्यात अनेक वेळा या मोरीवरून पाणी वाहत असते. अशा तिव्र वाहत्या पाण्यातून धोका पत्करून पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात पाच- सहा जणांनी यापूर्वी आपले जीव गमावले आहेत. मागील वर्षीच्या पावसाळ्यात तळगुळी येथील महिला पाण्यातून वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली होती. आणखी दोन घटनांमध्ये वाहून गेलेल्या पुरुष व महिलेने झाडाला पकडून ठेवल्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावले होते. काही वेळा दुचाकी वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मोरीवर पाणी आल्यानंतर घुलेवाडी येथील तरुण मंडळ येथे सामाजिक बांधिलकीतून जागता पहारा देण्यासाठी तैनात असते, तरीही दुर्घटना घडत राहतात.

   हा मार्ग चंदगड, बेळगाव- वेंगुर्ला राज्य मार्गावरील पाटणे फाटा, माणगाव, कोवाड,  कामेवाडी, दड्डी ते हत्तरगी येथे पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे वर्षभर वाहनांची मोठी वर्दळ येथून सुरू असते. या ओढ्यावर निटूर नंबर २ लघु पाटबंधारे धरण बांधण्यात आले असून बंधारा ओव्हर फ्लो झाल्यावर थोड्या पावसानेही या मोरीवरून पाणी वाहत असते. परिणामी वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. अशावेळी तीन किलोमीटर वरील कोवाड येथे जायचे असले तरी  मलतवाडी, सांबरे, नेसरी मार्गे २५-३० किलोमीटरचा फेरा मारून यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने मोरीची उंची वाढवण्याबरोबरच रस्ता काम सुरू करुन पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. अशी मागणी होत असून मार्च अखेर कामाची सुरुवात न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच घुलेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment