शॉक लागून बुक्कीहाळ येथे तरुणाचा मृत्यू, पंचनाम्यासाठी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची गाडी रात्री बारापर्यंत ग्रामस्थांनी अडवली, मध्यरात्रीला झाला पंचनामा - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2023

शॉक लागून बुक्कीहाळ येथे तरुणाचा मृत्यू, पंचनाम्यासाठी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची गाडी रात्री बारापर्यंत ग्रामस्थांनी अडवली, मध्यरात्रीला झाला पंचनामा

  

संपत सुरेश बच्चनहट्टी

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

    बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) येथे आपल्या शेतामध्ये बैलाने उसामधील सऱ्या फोडत असताना बांधावर असलेल्या वीज खांब्याच्या ओढणीचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. संपत सुरेश बच्चनहट्टी  (वय २१) असे त्या मृत तरुणाचे नाव असून शुक्रवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. 

   कोवाडहुन बेळगावकडे जाताना बुक्कीहाळ फाटा ते बुक्कीहाळ बुद्रुक या मार्गावर सदर घटना घडली. त्याच्या  पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, दोन बहिणी आहेत. बैल जोडीने शेत नांगरताना अडचण झालेल्या वीज खांबाच्या ओढणीला स्पर्श झाल्याने सदर तरुणाला 1100 व्होल्टचा वीज धक्का बसला. यामुळे जागीच तो ठार झाला. गतवर्षी या लाईनवर दुसऱ्या खांब्याशेजारी मृत तरुणांच्या दोन म्हैस जागीच मेल्या होत्या. त्याचीही नुकसान भरपाई अद्याप त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेली नाही. या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले. यानंतर सायंकाळी पावणे सात वाजता चंदगडचे वीज वितरणचे मुख्य अभियंता विशाल लोधी व त्यांचे पथक आले होते. 

मात्र त्यांनी पंचनामा उद्या होणार आहे, असे सांगितल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले. प्रा. यल्लाप्पा पाटील, परशराम कोकीतकर,  राम ढबळे, इराप्पा पाटील, गीतेश  वरगे, भरमा पाटील  यांचेसह गावातील शेकडो तरुण व नागरिकांनी पंचनामा आजच करा, या मागणीवर ग्रामस्थ अडुन बसले. सायंकाळी 6.45 वाजता आलेले वीज  वितरणचेचे अधिकारी  विशाल लोधी यांची गाडी रात्री बारा वाजेपर्यंत अडवून ठेवण्यात आली होती.  रात्री बारा वाजता कोल्हापुरातून इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर  युवराज वाघ आल्यानंतर पंचनामा करण्यात आला. यानंतर अधिकाऱ्यांची गाडी ग्रामस्थांनी सोडली. 

    दरम्यान महाराष्ट्र केसरी पैलवान व वीजवितरणचे निवृत्त अधिकारी विष्णू जोशीलकर यांच्यासह कागणी येथील सामाजिक कार्यकर्ते नरसिंग बाचूळकर, जनार्दन देसाई,  पोलीस पाटील, सट्टूप्पा मेनसे यांनीही ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम होते. 

शिवसेनेचे राजू रेडेकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्या तरुणावर रात्री १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान आमदार राजेश पाटील यांनीही सदर दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.No comments:

Post a Comment